काँग्रेस बुडती नाव, राष्ट्रवादी का विलीन होईल?; भाजपच सर्वात चांगला पर्याय, चंद्रकांत पाटील यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोणताही मोठा मुद्दा नसल्याने केवळ चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. काँग्रेस ही “बुडती नाव” असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस त्यात विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. उलट असा प्रयत्न झाल्यास काँग्रेसमधील नेतेच इतर पक्षांकडे वळतील, असे ते म्हणाले. Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील यांनी भाजप सध्या सर्वात सक्षम आणि आकर्षक राजकीय पर्याय असल्याचे सांगत काँग्रेसमधून नेत्यांचे पलायन सुरू असल्याचा आरोप केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरही त्यांनी टीका केली. विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसताना निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही उमेदवार रुग्णालयात दाखल आहेत तर काही संपर्काबाहेर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची घेतलेली भेट ही केवळ विधान परिषद निवडणुकीसंदर्भात होती, असे स्पष्ट करत भविष्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.



शक्तिपीठ महामार्गाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला मोठा विरोध झाला होता. मात्र योग्य नुकसानभरपाईचे पॅकेज जाहीर झाल्यानंतर विरोध कमी झाला. शक्तिपीठ महामार्गासाठीही सरकारने स्पष्ट नुकसानभरपाई जाहीर केल्यास शेतकरी स्वतःहून जमीन देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाबाबत समाधान आहे. मात्र विरोधकांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी मुद्दे उचलावे लागत असल्याने रोहित पवार आंदोलने करत आहेत. ते दररोज नवा मुद्दा घेऊन पत्रकार परिषद घेतात आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला.

जळगाव विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीबाबतही संबंधितांची भूमिका समजून घेतल्यास आणि संवाद साधल्यास प्रश्न सुटतात. नाशिकप्रमाणेच जळगावमधील तिढाही लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Why Would NCP Merge with a Sinking Congress?’ BJP Is the Best Option, Says Chandrakant Patil

महत्वाच्या बातम्या