विशेष प्रतिनिधी
ढाका: बांगलादेशातील ‘इन्कलाब मंच’ या संघटनेचे युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण बांगलादेशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. हादी यांच्या हत्येच्या निषेधार्थ राजधानी ढाकासह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झाले असून, काही भागांत हिंसक घटना आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. Sharif Osman Hadi
१२ डिसेंबर रोजी प्रचारादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी शरीफ उस्मान हादी यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना ढाकामध्ये घडली होती. गंभीर जखमी झालेल्या हादी यांना तत्काळ सिंगापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. हादी यांच्या निधनानंतर बांगलादेश सरकारने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
शरीफ उस्मान हादी हे बांगलादेशातील प्रभावी युवा आणि विद्यार्थी नेते म्हणून ओळखले जात होते. ते ढाका विद्यापीठातील ‘जातीया छात्र शक्ती’ या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते आणि सामाजिक व राजकीय प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत असत. याआधी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनांमध्येही हादी सक्रिय सहभागी होते.
हादी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने सुरू केली आहेत. ‘इन्कलाब मंच’ने ढाकामधील शाहाबाग परिसरात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हजारो समर्थकांनी घोषणाबाजी करत हादी यांच्या हत्येचा निषेध केला. आंदोलकांनी दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचेही समोर आले आहे. ढाकामध्ये ‘जातीया छात्र शक्ती’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशचे गृह खात्याचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या घरावर हल्ला करून आग लावल्याची घटना घडली. तसेच देशातील सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या ‘प्रोथोम अलो’ या दैनिकाच्या कार्यालयालाही आग लावण्यात आली.
प्रत्यक्षदर्शींनुसार, आंदोलकांनी आधी इमारतीला घेराव घातला आणि त्यानंतर आग लावली. या घटनेदरम्यान अनेक पत्रकार आणि नागरिक इमारतीत अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दल आणि सुरक्षायंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत केली.
आंदोलकांनी यावेळी माजी पंतप्रधान शेख हसीना तसेच आवामी लीग सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हादी यांची हत्या ही राजकीय कटाचा भाग असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, बांगलादेश सरकार आणि सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या असून राजधानीसह संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून दोषींना लवकरच अटक केली जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Huge discontent in Bangladesh after the death of youth leader Sharif Osman Hadi
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा, नाना पटोले यांची पंतप्रधानांकडे मागणी
- Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळला
- माणिकराव काेकाटे यांना पाेलीसांनीच पळवले, प्रकाश आंबेडकर यांचा आराेप
- हे देशप्रेम नव्हे तर पाकिस्तान प्रेम, एकनाथ शिंदे यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर संताप