Ashadhi Wari 2026: पंढरपुरात शिंदेंकडून अतिरिक्त 5 कोटींचा निधी मंजूर; अवघ्या 20 मिनिटांत जीआर जारी!

विशेष प्रतिनिधी

पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात वारकऱ्यांसाठी उभारलेल्या सोयी- सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चंद्रभागा वाळवंट आणि दर्शन रांगेतील पत्राशेड येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जाहीर केला. विशेष म्हणजे अवघ्या २० मिनिटांत या निधी वितरणाचा शासन आदेश अर्थात जीआर देखील जारी करण्यात आला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या गतिमान शैलीने वारकरी आणि पंढरपूरकर भारावून गेले. ( Ashadhi Wari 2026 )

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पंढरपुरात वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यादरम्यान त्यांना काही असुविधा व अडचणी दिसून आल्या. दर्शन रांगेतील पत्राशेड आणि चंद्रभागा वाळवंट परिसरात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उत्तम व्यवस्था उभारण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली. चर्चा करतानाच त्यांनी ५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. विशेष म्हणजे निधी जाहीर होताच २० मिनिटांत त्याचे शासन परिपत्रक अधिकृतपणे नगर विकास विभागाने प्रसिद्ध केले. ( Eknath Shinde )



यावेळी एकनाथ शिंदे यांनी पत्राशेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपातील रांगेत उभे असलेल्या भाविकांशी थेट संवाद साधला आणि स्वतःच्या हस्ते त्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. आरोग्य विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय कक्षाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, स्वतः होडीत बसून त्यांनी चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला. नदीपात्रात तैनात असलेल्या यंत्रणेकडे लाईफ जॅकेटबाबत विचारपूस करत, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, या पाहणी दौऱ्यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, पंढरपूर नगराध्यक्ष प्रणिता भालके, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Wari 2026: Shinde sanctions additional funds of ₹5 crore for Pandharpur 

महत्वाच्या बातम्या