विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत पुन्हा एकदा दहशतवादाच्या सावटाखाली आला आहे. बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात शनिवारी संध्याकाळी सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून मुलांसह अनेक प्रेक्षक जखमी झाले आहेत.
डॉन वृत्तपत्रानुसार, जिल्हा पोलिस अधिकारी वकास रफीक यांनी सांगितले की, हा स्फोट इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) च्या साहाय्याने करण्यात आला. त्यांच्या मते, हा हल्ला पूर्णपणे नियोजनबद्ध होता आणि यामागे सखोल तयारी करण्यात आली होती. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
सामना पाहण्यासाठी शेकडो नागरिक मैदानात उपस्थित होते. स्फोट झाल्याबरोबर मैदानात प्रचंड गोंधळ उडाला. पालकांनी मुलांना उचलून सुरक्षित स्थळी धाव घेतली. अनेकांना किरकोळ जखमा झाल्या तर काहींना गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच सुमारास दहशतवाद्यांनी क्वाडकॉप्टर ड्रोनच्या साहाय्याने पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षादलांनी तो प्रयत्न हाणून पाडला. या घटनेनंतर बाजौर आणि खार परिसरात सुरक्षा दलांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. सीमावर्ती भाग असल्याने या जिल्ह्यात पूर्वीपासूनच अतिरेक्यांची वर्दळ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाकिस्तान सरकारने घटनेचा निषेध व्यक्त केला असून हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
बाजौर जिल्हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असून येथे अनेकदा तालिबानशी संबंधित दहशतवादी हालचाली आढळल्या आहेत. मागील काही वर्षांत येथे अनेक आत्मघाती हल्ले, पोलिस व सैन्यावर घातपात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिक कायम भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.
Massive explosion during cricket match in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa province
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा