उत्पादन क्षमता घसरली, बेरोजगारी वाढली, राहुल गांधींची मोदींच्या ‘मेक इन इंडिया’वर टीका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात 2014 पासून गाजवण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी तीव्र टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना मोठ्या घोषणांसह आणि उदात्त उद्दिष्टांसह सुरू केली होती, पण प्रत्यक्षात ही योजना अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, “2014 मध्ये मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’सारख्या योजना मोठ्या गाजावाजाने सुरू केल्या. त्यावेळी देशातील तरुणांना रोजगार, देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवणे आणि भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं. मात्र, आज 10 वर्षांनंतर आपण पाहतो की या योजनेचे जाहीर उद्दिष्ट पूर्ण झालं नाही. देशातील उत्पादन क्षमता 2014 मध्ये 75% होती, ती आता फक्त 14% वर आली आहे. देशात उत्पादन क्रांती येईल, रोजगार निर्माण होतील आणि भारत आत्मनिर्भर बनेल, असा विश्वास जनतेला दिला गेला. मात्र, प्रत्यक्षात देशात उत्पादन घटले, बेरोजगारी वाढली आणि चीनकडून आयात दुपटीहून अधिक झाली आहे.

राहुल गांधी म्हणाले, “2014 पासून मोदीजींनी मेक इन इंडियाच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवण्याचं स्वप्न दाखवलं. मात्र, सत्य हे आहे की आज देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत उत्पादनाचा वाटा फक्त 14% राहिला आहे. युवक बेरोजगार आहेत आणि देशात उत्पादन कमी होत असताना चीनकडून आयात मात्र प्रचंड वाढली आहे.”

“मी नुकतीच दिल्लीतील नेहरू प्लेस येथे शिवम आणि सैफ या तरुणांशी भेट घेतली. दोघंही अत्यंत बुद्धिमान, कुशल आणि मेहनती आहेत. पण त्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधीच मिळत नाही. आजची वस्तुस्थिती अशी आहे – आपण केवळ गोष्टी असेंबल करतो, आयात करतो, पण स्वतः काही निर्माण करत नाही. त्यातून चीनला फायदा होतो, भारताला नव्हे,” अशी खंत राहुल गांधींनी व्यक्त केली.

“मोदी सरकारने फार गाजावाजा करत ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI)’ योजना आणली होती. पण आता सरकार ही योजना गुपचूप मागे घेत आहे. काहीही नवीन कल्पना उरलेल्या नाहीत. हे अपयश लपवण्यासाठी केवळ घोषणांचाच आधार घेतला जात आहे,” असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, “आपल्याला मूलगामी आर्थिक धोरणांची गरज आहे. लाखो उत्पादकांना मदत करण्यासाठी पारदर्शक सुधारणा आणि आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. जर आपण इथे निर्माण केलं नाही, तर दुसऱ्यांकडून आयात करावी लागेल. वेळ निघून जात आहे.”

Production capacity has declined, unemployment has increased, Rahul Gandhi criticizes Modi’s ‘Make in India’

महत्वाच्या बातम्या