study in America : अमेरिकेतील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक फतवा; व्हिसासाठी सोशल मिडिया अकाउंट ‘पब्लिक’ ठेवणे बंधनकारक

विशेष प्रतिनिधी

वी दिल्ली / वॉशिंग्टन : अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मिळवण्याच्या प्रक्रियेत आता आणखी एक अडथळा उभा राहिला आहे. अमेरिकेतील दूतावासाने भारतातील सर्व विद्यार्थी व्हिसा (F, M, J प्रकार) अर्जदारांना आदेश दिला आहे की, त्यांनी आपले सोशल मीडिया अकाउंट्स ‘पब्लिक’ म्हणजे सर्वांसाठी खुले ठेवावे. यामुळे त्यांची पार्श्वभूमी तपासता येईल. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या ओळखीची खात्री आणि ‘अ‍ॅडमिसिबिलिटी’ म्हणजे अमेरिकेत प्रवेशासाठी पात्रता तपासण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. study in America

ही घोषणा अमेरिका सरकारच्या नवीन “सामाजिक मीडिया व्हेटिंग” (Social Media Vetting) धोरणाचा भाग आहे. त्यानुसार, आता Facebook, LinkedIn, TikTok, Instagram आणि X (पूर्वीचे Twitter) यासारख्या प्लॅटफॉर्मवरील प्रोफाईल्स आणि पोस्ट्स स्कॅन करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अमेरिकेविषयी विरोधी भावना, दहशतवादाला पाठिंबा देणारी भूमिका, किंवा कोणत्याही प्रकारचा राष्ट्रविरोधी मजकूर पोस्ट केला असेल तर अशा अर्जदारांना व्हिसा नाकारण्यात येऊ शकतो.

ही योजना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘ कडक व्हिसा धोरणां’चा परिपाक आहे. ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी देखील विद्यार्थी व्हिसा अर्जांवर बंदी घातली होती, त्यामागे सुरक्षेचे आणि फसवणुकीचे कारण दिले गेले होते. या नव्या आदेशाचा परिणाम F व्हिसा (शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी), M व्हिसा (व्यावसायिक प्रशिक्षणासाठी) आणि J व्हिसा (सांस्कृतिक व शैक्षणिक एक्सचेंजसाठी) अर्ज करणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांवर होणार आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. सोशल मिडियावरून अनेक वेळा व्यक्तीचे वास्तव विचार आणि धोके स्पष्ट होतात. त्यामुळे अशा व्यक्तींना देशात येण्यापूर्वीच रोखणे शक्य होते.”

दरम्यान, भारतात अनेक विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाला गोपनीयतेच्या उल्लंघनाचा भाग म्हणत विरोध दर्शवला आहे. “एका प्रगत राष्ट्राने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया हॅंडल्सवर नजर ठेवणे ही मागास मानसिकतेची खूण आहे,” असे मत सोशल मिडिया तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हा आदेश अमेरिकेत शिक्षण घेण्याची स्वप्नं पाहणाऱ्या हजारो भारतीय तरुणांसाठी मोठी अडचण निर्माण करू शकतो, कारण अनेक विद्यार्थी आपल्या वैयक्तिक विचारांमुळे किंवा मिम्समधून केलेल्या विनोदी पोस्ट्समुळे सुद्धा आता व्हिसासाठी अपात्र ठरू शकतात. study in America

Shocking fatwa for Indian students wishing to study in America; Social media accounts must be kept ‘public’ for visa

महत्वाच्या बातम्या