तू दिसायला खूप सुंदर पण पतीला तुझी खरी क्षमता ओळखता येत नाही, अशोक खरात असे टाकायचा जाळे

विशेष प्रतिनिधी

नाशिक : तू दिसायला खूप सुंदर आहेस. तुझा पती तुला समजून घेण्यात कमी पडतो. तुझी खरी क्षमता त्याला ओळखता येत नाही, असं गोडगोड बोलून भोंदूबाबा अशोक खरात भावनिक पातळीवर जवळीक साधून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा, अशी माहिती तपासात समोर आली आहे. Ashok Kharat

दहावी नापास असलेला अशोक खरात अभ्यासात हुशार नसला तरी त्याला मानसशास्त्राचा चांगला अभ्यास होता. तो महिलांच्या अडीअडचणी जाणून घेत. त्यांच्याशी गोड बोलून, त्यांच्या भावनांना हात घालायचा. गरजू आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या, अडचणीत सापडलेल्या किंवा वैयक्तिक आयुष्यात गोंधळात असलेल्या महिलांना तो टार्गेट करायचा. त्यांच्या अडचणी दूर करायच्या नावाखाली तो महिलांना गुंगीचं औषध द्यायचा.



ऊर्जा हस्तांतरणाच्या नावाखाली तो महिलांचं लैंगिक शोषण करायचा. महिलांनी आरोपी अशोक खरातला विरोध केला तर तो त्यांना प्रकोप करण्याची भीती दाखवायचा. दैवी शक्तीने कुटुंब, संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी द्यायचा. आरोपीच्या या मोडस ऑपरेंडीमुळे अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेली महिला बाहेर पडू शकत नव्हती. तिच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन अशोक खरात त्यांच्यावर अत्याचार करत असे, असं तपासात समोर आलं आहे.

आज खरातची पोलीस कोठडी संपत असून, त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान आतापर्यंत काय माहिती समोर आली, याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला जाऊ शकतो.

स्वतःला अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर सिन्नरच्या मिरगाव येथे ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ संस्थानच्या आडून आपले काळे साम्राज्य चालवत होता. एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

Ashok Kharat used such lines to trap victims

महत्वाच्या बातम्या