अयानकडून मित्राच्या फ्लॅटवर तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडीओ शूट

विशेष प्रतिनिधी

अमरावती : अमरावती सेक्स ब्लॅकमेल प्रकरणातील मुख्य आरोपी अयान याचा एक मित्र अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतो. याच ठिकाणी अयान तरुणींना घेऊन येत होता. इथे तरुणींवर अत्याचार करून तो त्यांचे अश्लील व्हिडीओ शूट करायचा. या कामासाठी तो त्याच्या मित्राला पाचशे रुपये द्यायचा, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

अमरावतीच्या परतवाडा शहरात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीनं पीडित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करत असतानाचे फोटो आणि अश्लील व्हिडीओ काढले . हे व्हिडीओ व्हायरल करत त्याने वारंवार पीडितांना ब्लॅकमेल केल्याचा देखील आरोप आहे.

आरोपीच्या मोबाइलमधून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह डेटा जप्त करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाइलमधील माहिती डिलीट केली होती. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोशल मीडियावरून संबंधित व्हिडीओ हटवण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग सक्रीय झाला असून, हे व्हिडीओ फॉरवर्ड करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामागे एखादे मोठे संघटित रॅकेट सक्रीय असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. चिखलदरा परिसरातील काही हॉटेलचे सीसीटीव्ही फूटेज या तपासात महत्त्वाचे दुवे ठरू शकतात, त्या दिशेनेही आता एसआयटीने तपास सुरू केला आहे.



मुख्य आरोपी अयान अहमद याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांनाही जेरबंद केले आहे. आरोपींनी आठ अल्पवयीन मुली आणि महिलांचे १८ व्हिडीओ व ३९ छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे.

आरोपी अयानने हे व्हिडिओ त्याचा मित्र उजेर खान (वय २०, अचलपूर) याला पाठवले असल्याचे निष्पन्न झाले. पुढे उजेरने हे व्हिडिओ मो. साद (वय २२) आणि तरबेज खान (वय २४) यांना व्हॉट्स अ‍ॅपवर शेअर केले. या तिघांनीही व्हिडिओ पुढे प्रसारित केल्याचे उघड झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय, टेलिग्रामद्वारेही व्हिडिओ पाठवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून संबंधित व्यक्तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

अयान अहमद हा कोणताही कामधंदा न करता वडिलांच्या ‘ऑटो डील’ व्यवसायातील जुन्या महागड्या कार वापरून शहरात बडेजाव मिरवत असे. याच गाड्यांमधून फिरणे आणि सोशल मीडियावर रील बनवून तरुणींवर प्रभाव पाडणे ही त्याची कार्यपद्धती होती. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तो तरुणींचे लैंगिक शोषण करायचा आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा.

या प्रकरणातील पीडितांमध्ये मुस्लीम तरुणींचाही समावेश असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून उद्या आयोगाचे पथक परतवाडा येथे भेट देणार आहे. दुसरीकडे, स्थानिक मुस्लीम संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. काजी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन दिले असून, ‘अशा नराधमाला धर्माच्या चष्म्यातून न पाहता भरचौकात कठोर शिक्षा द्या,’ अशी मागणी केली आहे.

Ayan Accused of Sexually Exploiting Young Women and Filming Obscene Videos at Friend’s Flat

महत्वाच्या बातम्या