बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश , प्रहार संघटना फक्त सामाजिक कार्य करणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपण पुन्हा एकदा शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हाती घेत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. Bacchu Kadu

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू म्हणाले की, “शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या होत्या आणि त्या सर्व अटी एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हमीभावात सुधारणा, ‘लाडक्या बहिणी’ योजनेत विधवा महिलांचा समावेश, तसेच दिव्यांग मंत्रालयाचे बळकटीकरण हे आमचे प्रमुख मुद्दे होते. हे सर्व मुद्दे मान्य झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू. मात्र, त्याबदल्यात आम्हाला शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्य जनतेची ताकद हवी आहे. या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार का यावर त्यांनी सांगितले की, “प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार आहेत. ज्यांना राजकारणात काम करायचे आहे ते शिवसेनेत येतील, तर सामाजिक कार्य करणारे प्रहार संघटनेतच राहतील.”

आम्ही शिवसेना मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू. पण आमच्या रक्तातील प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी काम करेल, तितकाच तो शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठीही वाहणार आहे.”
आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. मात्र, कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर पक्ष सोडला होता. याबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पत्र लिहिले होते. त्या वेळी हमीभावाच्या प्रश्नावर आम्ही शिवसेना सोडली होती. आता पुन्हा त्याच शेतकरी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यांसाठी शिवसेनेत परत येत आहोत. शिवसेना माझा राजकीय जन्म आहे आणि शेवटपर्यंत शिवसेनेतच राहण्याची माझी इच्छा आहे.”

दरम्यान, बच्चू कडू यांनी राजकीय वादांबाबतही मवाळ भूमिका घेतली आहे. “आमचं कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आमचं कोणतंही वैर नाही. आमच्यात केवळ मुद्द्यांवर मतभेद होते. राणा दाम्पत्यासोबत असलेला वादही आता संपल्याचे त्यांनी जाहीर केले.

Bacchu Kadu joins Shiv Sena; Prahar organization to focus only on social work

महत्वाच्या बातम्या