महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘रीलस्टार’ संतोष पंडितवर गुन्हा दाखल!

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुण्यातील टिळक रस्त्यावर आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन आणि विनयभंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया ‘रीलस्टार’ संतोष पंडित याच्या विरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला पत्रकाराच्या पेहरावावर टिप्पणी करून तिचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. Santosh Pandit

नेमकी घटना काय?

नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी पुणे शहरांतील टिळक रस्त्यावर विविध महिला संघटनांच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याच वेळी संतोष पंडित तेथे उपस्थित होता. त्याच्या मते, आंदोलनासाठी आलेले पत्रकार आणि आंदोलकांमुळे रस्ता अडवला जात होता, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत होता.

या परिस्थितीचे चित्रीकरण संतोष पंडित आपल्या मोबाईलद्वारे करत असताना, तिथे उपस्थित असलेल्या एका महिला पत्रकाराने त्याला हटकले आणि आपल्या मोबाईलद्वारे त्याचेही चित्रीकरण सुरू केले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.



फिर्यादीतील गंभीर आरोप
महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीनुसार, संतोष पंडितने केवळ वाद घातला नाही, तर तिच्या पेहरावावरून अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. तसेच, तिची परवानगी नसताना तिचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने प्रसारित केले. या कृत्यामुळे आपली मानहानी झाली असून विनयभंग झाल्याचे पत्रकाराने फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिस कारवाई

घटनेनंतर मंगळवारी महिला पत्रकाराने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संतोष पंडित विरुद्ध विनयभंग,शिवीगाळ व गैरवर्तन माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमे यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Pune: Case Registered Against ‘Reel Star’ Santosh Pandit for Molesting Female Journalist

महत्वाच्या बातम्या