संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराजांचा संताप; आमदारकी रद्द करण्याची केली मागणी…

विशेष प्रतिनिधी

पुणे:कोल्हापूरमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणात खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली आहे.

शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शाहू महाराज छत्रपती यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “संजय गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत अयोग्य असून, जनता हे अजिबात सहन करणार नाही. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी कोणाबद्दल काय बोलायचं याची जाणीव ठेवली पाहिजे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रकरणात सरकारने तातडीने योग्य ती कारवाई करावी. “या सरकारमध्ये काही गोष्टी लगेच होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, अशा गंभीर प्रकरणात विलंब होऊ नये. आमदारकी रद्द करण्यासंदर्भातील नियम मला माहिती नसले तरी, गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे,” असेही त्यांनी नमूद केले. तसेच, आता जनताच या वक्तव्याकडे बारकाईने लक्ष देईल आणि त्यावर प्रतिक्रिया देईल, असेही ते म्हणाले.



संजय गायकवाड विरोधात तक्रार दाखल..

दरम्यान, या वादाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी गुरुवारी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाणे येथे औपचारिक तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या तक्रारीत आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करत जीवितास धोका निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मात्र, पोलिसांनी अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. “आम्ही आमच्या वकिलांशी चर्चा करून पुढील निर्णय तुम्हाला कळवतो,” असे सांगत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास तत्काळ नकार दिल्याची माहिती प्रशांत आंबी यांनी दिली आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Chhatrapati Shahu Maharaj’s anger on Sanjay Gaikwad; Demands cancellation of MLA post…

महत्वाच्या बातम्या