खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्यावर कारवाई

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात काेणालाही साेडणार नाही अशी विधानसभेत ठाम भूमिका मांडल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनातही झाडाझडती सुरू केली आहे.
मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची प्रतिनियुक्ती संपवून त्यांची बदली थेट मंत्रालयात करण्यात आली आहे.

अशोक खरातवर शेकडो महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले असून, कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

तपासादरम्यान अभिजीत भांडे पाटील यांचे अशोक खरातशी संबंध असल्याचे समोर आले आहेत. विशेषतः खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केल्याचे आरोप समोर आले आहेत. याशिवाय, खरातशी संबंधित इतर काही व्यवहारांमध्येही त्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.



या कारवाईनंतर महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरातशी संबंधित अनेक व्यवहारांमध्ये काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा सुरू असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे.

अशोक खरातच्या फसवणुकीच्या नव्या प्रकारांचाही उलगडा होत आहे. विविध अंधश्रद्धा पसरवत त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ‘एल्विश हनी’ नावाने विकले जाणारे मध तो चक्क 9 लाख रुपये किलो दराने विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे मध विशेष शक्तिवर्धक असल्याचे सांगत लोकांची फसवणूक केली जात होती. या माध्यमातून मिळालेला पैसा ट्रस्टच्या नावाने वळवून काळा पैसा पांढरा केल्याचाही संशय तपासात व्यक्त केला जात आहे.

Chief Minister takes action against Deputy Collector Abhijit Bhande Patil in Kharat case

महत्वाच्या बातम्या