बुवाबाज 39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी माकप आंदोलन करणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बुवाबाजीला शरण जात राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील झाल्याचे आरोप होत आहेत. अशा आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी व या आमदारांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने केली असून या आमदारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी राज्यभर तालुक्या-तालुक्यांमध्ये तीव्र आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे.

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, निवडून गेलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असतात. संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याची व तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. ही संविधानिक जबाबदारी पार न पाडता या उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून संविधानाने टाकलेली जबाबदारी पार न पाडणे आहे. अशा लोकप्रतिनिधींच्या निमित्ताने तंत्र-मंत्र, जादू-टोणा इत्यादी अंधश्रद्धेच्या गोष्टींना राजमान्यता मिळत असते. त्यामुळे सामान्य जनताही अशा भोंदू बाबांच्या भोंदूगिरीला बळी पडत असते. भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत तितकेच गुन्हेगार त्यांना समर्थन देणारे, शरण जाणारे व आपल्या अनुयायांना बुवा-बाबांवर विश्वास ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिशानिर्देश करणारे लोकप्रतिनिधीही गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे वाईट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे बळी पडलेल्या महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचत आहे. असे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटविण्याची कारवाई राज्य सरकारने करावी अशी मागणीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.



भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करत असतानाच त्याला समर्थन देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींवर व विविध मार्गाने त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या सर्वांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी माकप करत आहे.

बाबा खरात याच्याबरोबरच इतरही अनेक गावागावांमध्ये सध्या भोंदू बाबांचे उदंड पीक आले आहे. राज्यकर्त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादाचा पाठपुरावा करण्याऐवजी जाती आणि धर्म आधारित द्वेषवादी अंधश्रद्ध राजकारणाला बळ दिल्याचा हा परिणाम आहे. राज्य सरकारने राज्यातील या सर्व भोंदू बाबांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

सोबतच, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करून ते कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय त्वरित अमलात आणा, जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून सदर कायद्याची कठोर अंमलबजावणी करा व सोशल मीडियातून होणाऱ्या बाबा-बुवा, ज्योतिषी, मंत्र-तंत्र यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तातडीने तयार करा, या मागण्याही माकपच्या वतीने करण्यात येत आहेत.

वरील मागण्यासाठी दिनांक 6 एप्रिल रोजी होत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करत आहोत, असे नवले म्हणाले.

CPM to Launch Agitation Demanding Resignation of 39 MLAs Over Ashok Kharat Controversy

महत्वाच्या बातम्या