Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा ‘१०० शाळा भेट’ उपक्रम, पालघरमध्ये साधला विद्यार्थ्यांशी संवाद

विशेष प्रतिनिधी

पालघर : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांच्यात सुसंवाद वाढविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘१०० शाळा भेट’ उपक्रमाची सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालघर जिल्ह्यातील दुर्वेस (ता. पालघर) येथील जिल्हा परिषद शाळेपासून करण्यात आला. Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्याच दिवशी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य व पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. औषधी वन उद्यानात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक संदेश दिला.

मुख्यमंत्र्यांनी पीएम श्री योजनेंतर्गत विकसित झालेल्या या शाळेतील विविध उपक्रमांची आणि सुविधांची पाहणी केली. यामध्ये डिजिटल क्लासरूम, विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज प्रथालय (स्वच्छतागृह), औषधी वन उद्यान, टेरेस गार्डन व आपटीसीटी लंब प्रकल्पांचा समावेश होता. त्यांनी या सगळ्या बाबींचे कौतुक करत शाळेचा आदर्श मॉडेल म्हणून उल्लेख केला.



शाळेतील शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांचा उत्साह आणि पालकांचा सहभाग याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांशी व पालकांशीही संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पालकांनी अभिमानाने सांगितले की त्यांच्या मुलांना या शाळेत अत्याधुनिक शिक्षण, डिजिटल बोर्डचा वापर आणि प्रात्यक्षिक आधारित शिक्षण पद्धतीचा लाभ मिळत आहे.

राज्य शासनाच्या ‘१०० शाळा भेट’ उपक्रमांतर्गत १६ आणि १७ जून २०२५ या दोन दिवसांत पालघर जिल्ह्यातील १४२ शाळांना मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या उपक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात सशक्त नाते निर्माण होत असून, यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासोबतच शिक्षणाच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यभरात हाच उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असून, शिक्षणव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि शाळांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, असे स्पष्ट केले.

Devendra Fadnavis 100 School Visits initiative, interacted with students in Palghar

महत्वाच्या बातम्या