ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणात बदल! पण नेमकं कारण काय?

विशेष प्रतिनिधी

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबाबत एक मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. आळंदी येथून दरवर्षीप्रमाणे भव्य उत्साहात निघणारी पालखी दोन दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी असते. मात्र यंदा ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी देवस्थानच्या काही विश्वस्तांकडून पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण बदलण्याची चाचपणी सुरू आहे. या निर्णयामागे दोन वेगवेगळी कारणे पुढे येत आहेत. एकीकडे, मागील वर्षी पालखी मुक्कामादरम्यान आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यात झालेला वाद हा या निर्णयामागचा मुख्य कारण असल्याची चर्चा रंगली आहे. त्या वादामुळे दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि त्याचे पडसाद यंदाच्या नियोजनावर उमटत असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून मात्र हा निर्णय पूर्णपणे व्यवस्थापनाच्या दृष्टीने घेतला जात असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. पालखी विठोबा मंदिर आणि परिसरातील उपलब्ध जागा वाढत्या भाविकांच्या गर्दीसाठी अपुरी पडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरवर्षी लाखो वारकरी पुण्यात दाखल होत असल्याने गर्दी नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, आपत्कालीन सेवा आणि वाहतूक व्यवस्थापन यांसाठी मोठ्या आणि प्रशस्त जागेची गरज भासत आहे.
याच पार्श्वभूमीवर पर्यायी ठिकाणांचा शोध घेतला जात असून पुण्यातील काही मोकळ्या आणि विस्तीर्ण जागांची पाहणी देखील करण्यात आल्याची माहिती आहे. विशेषतः मोठ्या मैदानांवर पालखीचा मुक्काम आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात पालखीचा मुक्काम अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडता येईल, असा दावा संबंधितांकडून केला जात आहे.

आळंदी देवस्थान विश्वस्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्कामाच्या वादावर आळंदी देवस्थानचे विश्वस्त तसेच पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

वारकरी संप्रदायाचा विरोध

प्रस्तावाला वारकरी संप्रदाय आणि स्थानिक भाविकांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. पालखी विठोबा मंदिरात असलेला मुक्काम हा मागील अनेक वर्षांची परंपरा आहे. हा केवळ मुक्काम किंवा थांबा नसून परंपरेचा आणि संस्कृतीचा घटक आहे. अशा भावना वारकरी संप्रदाय पण व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत.

Dnyaneshwar Mauli’s place of stay in Pune has changed! But what is the real reason?

महत्वाच्या बातम्या