विशेष प्रतिनिधी
मुंबई : फ्रॉड निवडणुकांतून सत्तेत येणे याला काही सत्ता म्हणत नाहीत. मतदान करा, बाहेर या, शाई पुसा आणि पुन्हा आत जाऊन मतदान करा हा विकास आहे का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी सहकुटुंब दादर येथील बालमोहन विद्यामंदिर येथे मतदान केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक प्रक्रियेवर संताप व्यक्त करताना ते म्हणाले, माझे सर्व नागरिकांना, शिवसैनिक आणि मनसैनिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे. कारण आता छबीलदास येथे एक दुबार मतदार सापडला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु सगळीकडेच हा प्रकार सुरू आहे. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला काही मर्यादा हव्यात. परंतु नागरिकांना आणि मनसैनिकांनी याविषयी सतर्क राहावे. कोण कोण दुबार मतदार येतात आणि कोण शाई पुसत आहे यावर त्यांनी लक्ष ठेवावे.
राज ठाकरे म्हणाले की, सरकार ऐनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्यासाठी जे काही वाट्टेल ते करता येईल त्या सर्व गोष्टी सरकार आणि प्रशासन करत आहे. उदाहरणार्थ दुबार मतदारांच्या बाबतीत पहिल्यांदा आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही, असे काहीच नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर मुंबईत 10 लाख दुबार मतदार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता व्हीव्हीपॅटचा विषय आला. व्हीव्हीपॅट नसल्यामुळे आम्ही दिलेले मतदान कुणाला जात आहे हे कळायचा मार्ग उरला नाही. हे सर्व झाल्यानंतर आता त्यांनी ‘पाडू’ नामक यंत्र आणले आहे. हे यंत्र मतमोजणीच्या वेळी वापरले जाणार आहे. म्हणजे विरोधी पक्ष नावाची गोष्ट ठेवायचीच नाही, दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारने ठरवायचे की, कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या? जे त्यांनी विधानसभेला केले, तेच आताही ते करत आहेत. परंतु आम्ही ते होऊ देणार नाही, हा भाग वेगळा. पण आता त्यांनी हे मशीन आणले आहे. हे मशीन त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही. हे मशीन आणल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण आणि त्याची स्पष्टता निवडणूक आयोगाने द्यायची असते, पण ती दिली जात नाही. पत्र पाठवूनही ते माहिती देत नाहीत
मतदानावेळी मार्करच्या वापरासंदर्भात राज ठाकरे म्हणाले की, आज तर वेगळेच काहीतरी सुरू आहे. आतापर्यंत मतदानावेळी शाई वापरली जात होती. आज एक नवे पेन आणले आहे. त्याच्या सर्व बाजूंनी एवढ्या तक्रारी येत आहेत की, तुम्ही मतदान करून बाहेर पडलात तर सॅनेटायझरने ती शाई पुसली जात आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवस वाढवून दिला. परंतु असा कोणताही नियम नाही. त्यांनी हा नियम या निवडणुकीत अचानक आणला. खरं तर पैसे वाटण्यासाठी हा नियम आणला. संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी काम करत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या परीने जे काही करायचे आहे ते करतोय. पण हे काही चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत.
Is Wiping Ink and Voting Again Development? Raj Thackeray’s Angry Question