विशेष प्रतिनिधी
पुणे : देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्राने यंदा आघाडी घेतली असून, उत्तर प्रदेशाला मागे टाकत राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. Sugar Production
राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, २१० पैकी १८३ साखर कारखाने बंद झाले आहेत. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, २४ मार्चपर्यंत राज्यात ९८.८ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यामध्ये कोल्हापूर विभागात सर्वाधिक २३.१ लाख टन उत्पादन झाले असून, पुणे विभागात २२.१ लाख आणि सोलापूर विभागात १८.९ लाख टन साखर निर्मिती झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात वाढ झाली असली, तरी ही वाढ अपेक्षित सरासरीपेक्षा कमी असल्याने साखर उद्योगावरील आर्थिक दबाव कायम आहे.
राज्यात १ नोव्हेंबरपासून गाळप हंगामास सुरुवात झाली होती. २०२५-२६ या हंगामात आतापर्यंत ९८८.३८ लाख क्विंटल (९८.८ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी हे उत्पादन सुमारे ८० लाख टनांच्या आसपास होते.
यंदाचा गाळप हंगाम सरासरी ११० दिवसांचा राहिला आहे. गेल्या वर्षी हा कालावधी ८३ दिवसांचा होता. मात्र, साखर कारखान्यांचे अर्थकारण टिकवण्यासाठी किमान १४० ते १५० दिवस हंगाम चालणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे यंदा हंगाम वाढला असला, तरी उद्योगासमोरील अडचणी कायम आहेत.
राज्यातील उर्वरित २३ साखर कारखाने पुढील १५ दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील गाळप हंगाम पूर्णतः संपेल. दरम्यान, उत्तर प्रदेशातील साखर कारखाने एप्रिलच्या मध्यापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे.
यंदा राज्यातील २१० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. यामध्ये १०३ सहकारी आणि १०७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे १०४२.८८ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे.
देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्र (९८.८ लाख टन) अव्वल असून, उत्तर प्रदेश (८१.५० लाख टन) आणि कर्नाटक (४५.८० लाख टन) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मागील हंगामात महाराष्ट्रातील साखर उत्पादनात घट झाली होती; मात्र यंदा त्यात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे.
Maharashtra Overtakes Uttar Pradesh in Sugar Production
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर