विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप व्यक्त करत प्रकाशकाला थेट फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक 37 वर्षांपूर्वी प्रकाशित झाले आहे. Sanjay Gaikwad
सोशल मीडियावर या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. शिवाजी महाराजांविषयी अनादर केल्याचा आरोप करत गायकवाड यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. या संभाषणात त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. शिवाजी महाराजांविषयी असा उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फोनवरील संभाषणात गायकवाड यांनी प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. तुला घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल, जीभ कापेल, अशा धमक्या दिल्या.
दरम्यान, प्रकाशक प्रशांत आंबी यांनीही या प्रकरणात आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नसून प्राध्यापक गोविंद पानसरे यांचे आहे. तसेच हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले असून त्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी गायकवाड यांना आधी पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही समोर आले. प्रकाशकाने गायकवाडांच्या धमक्यांना घाबरून न जाता ठाम भूमिका घेतली. तुम्ही उद्या या आणि माझी जीभ कापा, असे उत्तर दिले. या प्रकरणावर वाढता दबाव पाहता संजय गायकवाड यांनी नंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीन मधे हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो.राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघीतली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे.
पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना ‘पानसरे चे जे हाल केले, ते करण्याची’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
MLA Sanjay Gaikwad threatens publisher over a book published 37 years ago
महत्वाच्या बातम्या