सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी

विशेष प्रतिनिधी

बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका झिरवळ यांनी मांडली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते अर्थमंत्री, बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागा कोण भरणार, पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने तातडीने निर्णय घ्यावा, असा संकेत या विधानातून देण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या अंत्यविधीत दिसलेली मांडणी, पार्थ आणि जय पवार यांची सक्रिय उपस्थिती आणि त्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा, या सर्व घटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत संकेत दिले आहेत. पक्षात नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, उपमुख्यमंत्रीपदासाठी नेमका कोणता चेहरा पुढे येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Narahari Jirval demands that Sunetra Pawar be given the post of Deputy Chief Minister of the state

महत्वाच्या बातम्या