बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; लक्ष्मण हाकेंचा पवारांच्या बालेकिल्ल्यात ‘ओबीसी’ एल्गार!

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राजकारण तापू लागले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली असून, बारामतीची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही,असा पवित्रा घेतला आहे.

या विधानामुळे बारामतीत आता ‘पवार घराणे विरुद्ध ओबीसी’ असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सहानुभूती संपली, लोकशाही जिवंत ठेवा!

लक्ष्मण हाके यांनी प्रस्थापित राजकीय संस्कृतीवर टीका करताना म्हटले की, “केवळ सहानुभूतीच्या जोरावर निवडणुका बिनविरोध करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. लोकशाहीत निवडणुकीचे महत्त्व काय असते, हे प्रगल्भ नागरिकांना ठाऊक आहे. दुःख केवळ मोठ्या नेत्यांच्या घरीच असते का? गावगाड्यातील सामान्य माणसाच्या दुःखाचे काय? अजितदादांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा वहिनी शपथ घेतात आणि सुप्रिया सुळे मुलीच्या लग्नाची घोषणा करतात; मग हे कसले दुःख? दादांची सहानुभूती आता संपली आहे, आता जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक व्हायलाच हवी.”

पवार घराण्यावर आरक्षणावरून प्रहार

पवार घराण्यावर थेट निशाणा साधताना हाके म्हणाले की, पवार घराणे कधीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलताना दिसत नाही. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत अजित पवार नेहमीच असंवेदनशील राहिले आहेत. बजेटमध्ये ओबीसींसाठी केवळ अर्धा टक्का तरतूद केली जाते, हा समाजावर अन्याय आहे. आमची लढाई थेट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. जर सुनेत्रा वहिनींना प्रतिनिधीत्व द्यायचे असेल, तर त्यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून पाठवावे, पण विधानसभेची जागा आम्ही लढवणारच.

नवा उमेदवार आणि राष्ट्रीय पक्षांची साथ!

बारामतीत उमेदवार कोण असेल, याबाबत सस्पेन्स कायम ठेवताना हाके यांनी सांगितले की, लवकरच पत्रकार परिषद घेऊन उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे, ‘आप’, ‘बसपा’ आणि ‘काँग्रेस’ यांसारखे राष्ट्रीय पक्ष आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी नमूद केले. ओबीसी समाजातील एका खंबीर नेतृत्वाला मैदानात उतरवून प्रस्थापितांची कोंडी करण्याचा हाके यांचा मानस आहे.

या घोषणेमुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीत आता नवी समीकरणे पाहायला मिळतील. प्रस्थापित घराण्यांच्या राजकारणाला ओबीसी कार्डाच्या माध्यमातून लक्ष्मण हाके कसे रोखतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

No Unopposed Election in Baramati! Lakshman Hake Launches ‘OBC Elgar’ in Pawar’s Stronghold

महत्वाच्या बातम्या