आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेत राज्याची वाटचाल आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने ठामपणे सुरू झाल्याचे स्पष्ट केले. “महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून देशाच्या विकासाचे इंजिन आहे. येत्या काळात राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा बनेल,” असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्वीकारून लोकशाही प्रजासत्ताकाची पायाभरणी केली. जगातील सर्वोत्तम संविधान देशाला लाभले असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मिती समितीला त्यांनी मानवंदना अर्पण केली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवरच देशाची आणि राज्याची प्रगती उभी आहे, असेही त्यांनी नमूद केले.



“आता महाराष्ट्र थांबणार नाही. संविधानाने दिलेल्या लोकशाही व्यवस्थेच्या बळावर राज्य अधिक गतिमान आणि समृद्ध होईल,” असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. भारत वेगाने जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, त्यात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक असल्याचे त्यांनी सांगितले. दावोस येथे सुमारे 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून रोजगारनिर्मितीला चालना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेतीसाठी पाणी, वीज आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहे. जलसंधारण, सिंचन आणि प्रभावी पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यावर भर दिला जाणार आहे. पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असून, एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ध्वजवंदनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तसेच जगभरातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि संविधानाचे महत्त्व व आर्थिक प्रगती हीच महाराष्ट्राची पुढील दिशा असल्याचे अधोरेखित केले.

Now Maharashtra Will Not Stop, Says CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या