विशेष प्रतिनिधी
पुणे : देशातील शेतकरी आंदोलन हे पूर्णतः परदेशी शक्तींच्या माध्यमातून घडवले गेले असून, स्थिर सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. या आंदोलनांना काँग्रेसकडून समर्थन मिळत आहे,’ असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिव प्रकाश यांनी केला. Shiv Prakash
भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित सक्रिय कार्यकर्ता संमेलनात ‘राष्ट्र के विकास में भाजपा की भूमिका’ या विषयावर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना काही मागण्यापूर्वीच मदत करत आहेत. तरीही आंदोलन घडवून आणले जात आहे. भाजप मात्र देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. देश सुरक्षित राहिला तरच विकास शक्य आहे, असे सांगून मंत्री शिव प्रकाश यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
देशाच्या संरक्षण धोरणाचा उल्लेख करताना त्यांनी १९९८ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या अणुचाचणीच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या निर्णयामुळेच भारत आज संरक्षण क्षेत्रात सक्षम झाला असून अनेक देशांना शस्त्र निर्यात करणारा देश म्हणून उदयास आला आहे, असे ते म्हणाले. ‘सिंदूर ऑपरेशन’नंतर जागतिक स्तरावर भारताचा दबदबा वाढला असून आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस कोणी करत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
समान नागरी कायद्याबाबत भूमिका स्पष्ट करताना शिव प्रकाश म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याला पाठिंबा दिला आहे. उत्तराखंडसह काही राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून भविष्यात तो संपूर्ण देशभर लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
भाजपच्या प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी जनसंघाच्या स्थापनेपासूनचा इतिहास मांडला. स्वातंत्र्य आणि देशरक्षणासाठी जनसंघ विसर्जित करण्याचा निर्णय घेतला गेला, त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत भाजपचा उदय झाला, असे त्यांनी सांगितले. आणीबाणीच्या काळातील संघर्ष, त्यानंतरचे नैराश्यपूर्ण वातावरण आणि त्या काळात निर्माण झालेला आत्मविश्वास यामुळेच पक्षाची वाढ झाल्याचा दावा केला.
१९८४ साली भाजपचे केवळ दोन खासदार निवडून आले होते आणि त्यावेळी पक्षाची टिंगलटवाळी करण्यात आली होती. ‘हम दो, हमारे दो’ अशा शब्दांत टीका झाली होती. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘एक दिवस कमल खिलेगा’ असा विश्वास व्यक्त केला होता आणि तो आज खरा ठरला आहे, असे शिव प्रकाश यांनी सांगितले.
१९९६-९७ दरम्यान भाजप सत्तेत आली असली तरी काँग्रेसकडून स्थिर सरकार देऊ शकत नसल्याची टीका झाली होती. मात्र, १९९८-९९ मध्ये बहुमताने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने स्थिर सरकार देत देशाला विकासाच्या मार्गावर नेले, असे त्यांनी स्पष्ट केले. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून त्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला, असे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसवर टीका करताना शिव प्रकाश म्हणाले की, सध्या त्या पक्षाची स्थिती अत्यंत खालावली असून देशविरोधी विचारांना समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत. तसेच कम्युनिस्ट पक्षालाही काँग्रेसकडून पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजपने सुशासन देत देशाला सक्षम नेतृत्व दिल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
Shiv Prakash alleges that the farmers’ movement is a conspiracy orchestrated by foreign powers.
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर