दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भीषण विमान अपघाताचा तपास जसजसा पुढे जात असताना धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या दुर्दैवी विमानाचे नियंत्रण करणारे कॅप्टन सुमित कपूर यांचा सुरक्षा नियमभंगाचा वादग्रस्त इतिहास समाेर आला आहे.

पंधरा हजारांहून अधिक तासांचे उड्डाण अनुभव असलेले कॅप्टन कपूर वरिष्ठ आणि विश्वासार्ह वैमानिक मानले जात होते. मात्र नोंदी तपासल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीवर गंभीर डाग असल्याचे उघड झाले आहे. नियोजित उड्डाणांपूर्वी दोन वेळा मद्यसेवन चाचणीत त्यांचा सकारात्मक अहवाल आला हाेता. भारतीय विमानवाहतूक नियमांनुसार हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो.

पहिली घटना १३ मार्च २०१० रोजीची आहे. दिल्ली ते बेंगळुरू या उड्डाणापूर्वी कॅप्टन कपूर मद्यचाचणीत दाेषी ठरले. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी, ७ एप्रिल २०१७ रोजी दिल्ली ते गुवाहाटी या उड्डाणाआधी पुन्हा एकदा ते मद्यचाचणीत दोषी आढळले. ही पुनरावृत्ती झालेली चूक असल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कडक शिस्तभंगाची कारवाई केली होती.



हा मुद्दा केवळ फाईल्सपुरता मर्यादित राहिला नव्हता. संसदेतही याचा उल्लेख झाला होता. राज्यसभेत केंद्रीय मंत्री पियुष गाेयल यांनी मद्यसेवन करणाऱ्या वैमानिकांबाबत माहिती मागितली होती. त्यावर उत्तर देताना तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री वायलर यांनी सांगितले होते की २००९ ते २०१० या काळात ५७ वैमानिक मद्यचाचणीत दोषी आढळले होते. पहिल्यांदा दोषी ठरलेल्यांना तीन महिने वेतनाविना ग्राउंड करण्यात येते, तर पुनरावृत्ती करणाऱ्यांचे परवाने पाच वर्षांपर्यंत निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर CAR सेक्शन ५, सिरीज F, भाग ३ या नियमांवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत झाले आहे. जुलै २०२४ मध्ये सुधारित करण्यात आलेल्या या नियमांनुसार वैमानिक आणि केबिन क्रू यांची उड्डाणपूर्व व उड्डाणानंतर मद्यचाचणी बंधनकारक आहे. संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून पारदर्शकता राहील.

अपघाताच्या तपासासोबतच आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कॅप्टन कपूर यांच्या भूतकाळातील इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले का ?देखरेख यंत्रणा पुरेशी सक्षम होती का ? कडक अंमलबजावणी झाली असती तर महाराष्ट्राला हादरवणारी ही दुर्घटना टाळता आली असती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित हाेऊ लागले आहेत. या प्रकरणामुळे देशातील विमान सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

SHOCKING PAST OF PILOT IN AJIT PAWAR PLANE CRASH

महत्वाच्या बातम्या