Vijay Vadettiwar : विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, निवडणूक आयोगाला म्हणाले नालायक

विशेष प्रतिनिधी

नागपूर : निवडणूक आयोग हा भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे. एवढा नालायक निवडणूक आयोग कुठेही नाही. निवडणुकांच्या अगोदर सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे व त्यातून निवडणुका जिंकायच्या हा भाजपचा धंदा बनला आहे, अशी टीका करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली.


भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी


विजय वडेट्टीवार म्हणाले, सध्या सगळीकडे बोगस मतदान व व्होटचोरी सुरू आहे. बिहारच्या एका माजी केंद्रीय मंत्र्याने याविषयी एक धक्कादायक विधान केले आहे. मी 2700 मतांनी हरलो होतो. पण तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी मला जिंकवले, असे तो म्हणाला. यावरून अंदाज मतचोरीचा अंदाज येतो. हे सर्व काही मतचोरीतून, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून, धमकावून निकाल फिरवले जातात. हरणाऱ्यांना जिंकवले जाते.

मी एकदा 2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मध्य प्रदेशात पक्ष निरीक्षक म्हणून गेलो होतो. तेव्हा भाजपचा एक मतदार 1 लाख मतांनी पराभूत झाला होता. तेव्हा भाजपचे लोक बंदूक घेऊन होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर बंदूक रोखून त्या उमेदवाराला विजयी घोषित करायला लावले. हे असेच सुरू आहे.

मुंबईत 15 लाख बोगस मतदार आहेत. तिथे एका मतदारांचे 3-4 वेळा नाव आहे. बोगस मतदारांचा आकडा याहून अधिक असू शकतो. त्याची तक्रार केल्यानंतरही निद्रावस्थेत असलेला निवडणूक काहीच करायला तयार नाही. उलट सत्ताधाऱ्यांना मदत कशी होईल हेच त्याचे चालले आहे. ब्रह्मपुरीतही बोगस आयडी मिळाले. बेईमानी करून निवडणुका जिंकण्याचा एकमेव धंदा आता भाजपने सुरू केला आहे.

धर्माबाद येथे मतदारांना डांबून ठेवल्याच्या घटनेवर विजय वडेट्टीवार म्हणाले, धर्माबाद नगरपरिषदेत हजारो मतदारांना डांबून ठेवण्याचा प्रकार घडला आहे. भाजप आमदार राजेश पवार यांच्यावर असे आरोप होत आहेत. भाजपला हार दिसली की तो कोणत्याही थराला जातो. कुणाचा जीव घेतील. कुणाला डांबून ठेवली. कुणाला मारून टाकतील. एकेका मतदाराला 5 हजार रुपये वाटले जात आहेत. एवढे पैसे आले कुठून. कुठून आले एवढे खोके. असे होत असेल तर पुढच्या निवडणुका पारदर्शक कशा होतील.

वडेट्टीवार म्हणाले, एवढे नालायक व निद्रावस्थेत असलेला निवडणूक आयोग कुठेही नाही. त्याचे निवडणुकीवर कोणतेही नियंत्रण नाही. हा बोगसपणा होताना तो कुठेही दिसत नाही. निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे एवढेच त्याचे काम उरले आहे. मग कुणी काहीही करा. हे डोळे बंद करून झोपलेल्या अवस्थेत राहतील. लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाची अशी भूमिका असते काय? एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई करताना दिसत आहे का? निवडणूक आयोग आता भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे हे आता लपून राहिलेले नाही.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी अजित पवारांचा स्वबळाचा नारा ही भाजपचीच रणनीती असल्याचाही आरोप केला. रोज सकाळी उठून सत्तेसाठी एकमेकांचा मुका घ्यायचा. हिंदुत्त्वादी म्हणून दोघांनी एकत्र यायचे आणि तिसऱ्याला वेगळी निवडणूक लढवण्यास सांगायचे. हीच त्यांची रणनीती आहे. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष किंवा पुरोगामी मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुका महायुती बाहेरून लढवण्यास सांगितले आहे. अजित पवार आज धर्मांध व जातीयवादी पक्षासोबत बसलेत. मग ते धर्मनिरपेक्ष कसे? हे लोक विचार करतील.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पैसा व बोगस या मतदानाच्या जोरावर भाजपच्या विजयाचा दावा करत आहेत. माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार, नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने मोठा जोर लावला आहे. भाजप तिथे एका मतासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये देत आहे. छोटी नगरपरिषद आहे. पण एका प्रभागामध्ये 700 ते 1200 मतदान आहेत. एवढ्या छोट्या पालिकेसाठी भाजप 40 कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे त्यांनी आम्ही जिंकलो म्हणून आत्ताच गुलाल उधळावा. त्यांनी निकालाचीही वाट पाहू नये.

Vijay Vadettiwar’s tongue slipped, he called the Election Commission incompetent

महत्वाच्या बातम्या