विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपने परवानगी दिली तर मी शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन. आज पुन्हा मी हे बोलत आहे, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. Ganesh Naik
पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले की, भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. मी आज हे पुन्हा बोलत आहे. भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला म्हणून मी ते मान्य केले. मनाला पटले नसले तरी कार्यकर्त्यांनी ते शांतपणे सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला.
एकेकाळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा व उर्वरित पदांची वाटणी करावी असे माझे मत होते. मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा आम्हाला होती. पण काही ठिकाणी ती संधी मिळालीच नाही, असे ते म्हणाले.
गणेश नाईक पुढे म्हणाले, नवी मुंबईत शिंदे गटाकडून 57 जागांची मागणी करण्यात आली. पण आमची त्यांना 20 ते 22 जागा देण्याची तयारी होती. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेच्या फैऱ्या सुरू होत्या. अखेर त्यांनी एबी फॉर्म भरले. त्यानंतर आम्हीही भरले. त्यानंतर जे झाले ते चांगलेच झाले. ठाण्यातील लोकांना काही करामत करता आली नाही. ठाण्यात भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही तेच झाले. त्यानंतरही पक्षाला जे मान्य होते तेच आम्ही मान्य केले.
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एकदा आदेश दिला की, तिथे इतर काही येत नाही. हे मी बोलणार नाही तर कोण बोलणार? त्यानंतरही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली. हे कौतुकास्पद आहे. सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढली असती आणि ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून आले त्यांना महापौर पदासह इतर प्रमुख पदे मिळाली असती. पण हे माझे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे, असेही गणेश नाईक यावेळी बोलताना म्हणाले.
Will Erase Shinde Faction If BJP Allows, Warns Ganesh Naik
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष; ईडी मनी लॉन्डरिंग केसला पूर्णविराम
- गुजरातच्या दारूबंदीच्या धर्तीवर गुटखा बंदीसाठी स्वतंत्र कायदा, नरहरी झिरवाळ यांची माहिती
- उध्दव ठाकरे यांच्या शिवसैनिकाला महापाैरपदासाठी पाठिंबा द्या, भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन
- महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर ; महिनाअखेरीस सत्तास्थापना