विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्यांच्यावर आपल्या वडिलांच्या हत्येचा आरोप होता, त्यांच्याच नातेवाईकांसोबत सत्तेत बसण्याचा निर्णय घेतल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी खासदार निंबाळकर यांना सहा प्रश्नही विचारले आहेत.Anjali Damania
शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी वेगळा निर्णय घेत शिंदे गटाशी जवळकी साधली आहे. या सहा खासदारांपैकी विशेषत: ओमराजे निंबाळकर यांच्यावर सर्व बाजुंनी टीका हाेत आहे. अंजली दमानिया यांनी याबाबत त्यांना सहा प्रश्न विचारले आहेत. दमानिया यांनी विचारलेले प्रश्न पुढीलप्रमाणे :
१. ज्या आरोपीवर स्वतःच्या वडिलांच्या हत्येचा ठपका होता, त्याच आरोपीचा मुलगा (राणा जगजितसिंह पाटील) या युतीत भाजपचा आमदार आहे, त्याच युतीत तुम्ही सामील होणार?
२. त्याच आरोपीची सख्खी बहीण (सुनेत्रा पवार) आज याच युतीत उपमुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत, तरीही तुम्ही त्याच युतीसोबत जाणार?
३. तुम्हाला खरोखर वाटतं का, की हे सरकार तुमच्या वडिलांच्या मारेकऱ्याला शिक्षा देईल? खरंच न्याय मिळेल?
४. सुनेत्रा पवारांच्या सख्ख्या भावाला (पद्मसिंह पाटील) शिक्षा करण्याची हिंमत खरंच या सरकारमध्ये आहे का?
५. भाजपच्याच आमदाराच्या वडिलांविरुद्ध खरंच कारवाई होईल?
६. हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहूनही, वडिलांसाठी आणि न्यायासाठी लढण्याऐवजी एका मंत्रिपदापायी तुम्ही शरणागती पत्करणार आहात का?
टीकेला उत्तर देताना ओमराजे निंबाळकर यांनी आपली बाजू मांडली. गोवर्धनवाडीत कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, “गेल्या सात वर्षांपासून मी विरोधी पक्षात आहे. खासदार असूनही केवळ सत्तेत नसल्यामुळे लोकांची कामे करण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. दरवेळी लोकांना ‘काम मंजूर होणार नाही’ असे किती दिवस सांगायचे? सत्तेत राहिल्याविना मतदारसंघाचा विकास होत नाही.”
“पवनराजे हत्याकांडाच्या निकालाबाबत मी स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी माझे बोलणे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी करून दिले. सीबीआय (CBI) या निकालावर उच्च न्यायालयात (High Court) अपील करणार आहे. मला कोणतीही वैयक्तिक फेवर नकोय, पण २० वर्षे जो लढा दिलाय, त्यात न्याय हवा आहे. मी कुठल्याही पैशांच्या किंवा पदाच्या आमिषाला बळी पडून पक्ष बदललेला नाही.” आपले राजकीय विरोधक असलेल्या राणा जगजितसिंह पाटलांना उद्देशून ओमराजे म्हणाले, “मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तर सत्तेत जाऊन त्यांच्या उरावर बसणार आहे.”
Anjali Damania poses six questions to Omraje Nimbalkar
महत्वाच्या बातम्या