Uddhav Thackeray : एकट्याने लढण्याची तयारी ठेवा, उध्दव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई: मनसेसोबत किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षांची युती होईल किंवा नाही. मात्र एकट्याने लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसेसोबतच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मनसेसोबतच्या युती बाबत स्थानिक वातावरणाची चाचपणी करा अशा सूचना केल्या.

आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कसं कोंडीत पकडायचं याबाबतही माहिती देत उध्दव ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करा. त्या अनुषंगाने पक्षबांधणी करुन कामाला लागा. युती होईल किंवा होणार नाही, मात्र एकट्याने लढण्याची तयारी ठेवा.

शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मनात जे आहे ते होईल असे सांगत राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर 24 तास उलटण्याच्या आतच त्यांनी युती होणार की नाही याबाबत संभ्रम व्यक्त केला.

आमदार-खासदारांच्या बैठकीनंतर बोलताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, ‘काल शिवसेनेचा वर्धापन दिवस होता आणि आज संघटनात्मक बैठक होती आणि सर्वच आमदार खासदार मुंबईत होते. येत्या काळात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाची पूर्वतयारी झालेली आहे.’

चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली.

यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, ‘मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल’ असं म्हटलं होतं. त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.

Be prepared to fight alone, Uddhav Thackeray appeals to office bearers

महत्वाच्या बातम्या