Prithviraj Chavan : विरोधकांना संपवण्याचा डाव, ठाकरे गटातील फुटीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Prithviraj Chavan शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटातील फूट ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देशभरातील विरोधी पक्षांना कमकुवत करण्याच्या व्यापक राजकीय रणनीतीचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला.Prithviraj Chavan

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नऊपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज्यात सुरू असल्याच्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारले असता ते म्हणाले, “ऑपरेशन लोटस, टायगर, लायन… मला या जनावरांची नावे माहिती नाहीत. मात्र ठाकरे गटात फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. त्यामुळे पक्षात विभाजन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.”Prithviraj Chavan



यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या राजकीय उद्दिष्टांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नरेंद्र मोदी सरकारला परिसीमन प्रक्रियेद्वारे उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व वाढवायचे आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधानात मोठे बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात एका व्यक्तीची हुकूमशाही निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असून लोकशाहीसाठी हा चिंतेचा विषय आहे,” असा आरोप चव्हाण यांनी केला.

विरोधी पक्षांतील नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याचाही दावा त्यांनी केला. “एका बाजूला ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवली जाते, तर दुसऱ्या बाजूला आर्थिक प्रलोभने दिली जातात. सत्ताधारी पक्षात गेल्यास निधी, कंत्राटे आणि इतर लाभ मिळतात, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना त्याला “ऑपरेशन बाजार” असे संबोधले. विरोधी पक्षांतील नेत्यांना विविध मार्गांनी आकर्षित करून पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Bid to eliminate opposition: Prithviraj Chavan attacks BJP over split in Thackeray camp

महत्वाच्या बातम्या