Nitesh Rane : संजय राऊत यांना ‘साप’ म्हणण्याच्या प्रकरणात नितेश राणेंना दिलासा; माझगाव कोर्टाने जामीनपात्र वॉरंट रद्द केलं

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात दाखल केलेल्या फौजदारी अब्रुनुकसानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. ‘साप’ म्हटल्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाने नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावरील जामीनपात्र वॉरंट रद्द करत त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मे २०२३ मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख ‘साप’ असा केला होता. त्याचदरम्यान, त्यांनी राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील केला होता. या विधानामुळे वाद निर्माण झाला आणि संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा मानहानीचा खटला दाखल केला. Nitesh Rane



या खटल्याच्या सुनावणीत नितेश राणे अनेक वेळा गैरहजर राहिल्यामुळे १६ मे रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. कोर्टाने आज २ जून रोजी राणेंना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

सध्या कोकण दौऱ्यावर असलेल्या राणेंनी माझगाव कोर्टात उपस्थित राहणं शक्य नसल्यामुळे, न्यायालयाने त्यांना सिंधुदुर्ग पोलिस ठाण्यात २ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. तसेच, कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी सशर्त परवानगी देखील दिली.

संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, नितेश राणे यांचं वर्तन हे केवळ अपमानकारकच नव्हे तर बदनामीकारक आहे, आणि त्याला कायदेशीर उत्तर देणं गरजेचं आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या आठवड्यात अपेक्षित आहे. न्यायालयाकडून राणेंना सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे निर्देश देण्यात येऊ शकतात.

Relief for Nitesh Rane in the case of calling Sanjay Raut a ‘snake’; Mazgaon court cancels bailable warrant

महत्वाच्या बातम्या