विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करत असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कथित बैठकीने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुतीमध्ये अधिकृतपणे प्रवेश केल्यास सत्तेत कोणते स्थान, कोणती जबाबदारी आणि कोणत्या प्रकारची राजकीय भागीदारी मिळू शकते, यावर दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक स्तरावर विचारविनिमय झाल्याचे समजते.
याशिवाय, महायुतीमध्ये थेट सहभागी न होता सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा पर्यायही चर्चेत आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा प्रकारची राजकीय मांडणी झाल्यास महाविकास आघाडीतील सध्याची समीकरणे बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यामुळे महाविकास आघाडीतील सर्वाधिक राजकीय दबाव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर येऊ शकतो. त्यामुळे ठाकरे गटाला राजकीयदृष्ट्या एकाकी पाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विनोद तावडे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून संभाव्य राजकीय पर्यायांबाबत चर्चा केली. आगामी काळात पक्षाची भूमिका काय असावी, याबाबत अंतर्गत स्तरावर विचारमंथन सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार गटातील किमान पाच खासदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असा
आमदार रोहित पवार यांनी त्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. पक्षात किंवा केंद्रातील कोणत्याही नेत्यांसोबत अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही विरोधी पक्ष म्हणून सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडत राहू,” असे ते म्हणाले. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, चर्चा करण्याला अर्थ नाही. पण चर्चा सुरू आहे एवढे मात्र नक्की आहे. आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर ठरतो हे त्यांनी ठरवायचे आहे. वैचारिक की सत्तेचा. सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर विश्वास ठेवायचा आहे की धन, संपत्ती आणि सत्ता मंत्री यावर विश्वास ठेऊन काम करायचे आहे, हे त्या लोकांचा संबंध आहे. त्यावर मला भाष्य करायची गरज नाही.