विशेष प्रतिनिधी
मुंबई : Heavy Rain राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम असून पुढील काही तासांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकृत सूचना पाळाव्यात, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (SEOC) केले आहे. संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्यभरात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि ६ राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.Heavy Rain
मान्सूनपूर्व नियोजनानुसार पालघर आणि नागपूर येथे प्रत्येकी दोन NDRF पथके तैनात करण्यात आली आहेत. तर पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव येथे प्रत्येकी एक आणि मुंबईत चार पथके कार्यरत आहेत. SDRF ची सहा पथके धुळे, नागपूर, नांदेड आणि गडचिरोली येथे सज्ज ठेवण्यात आली आहेत.Heavy Rain
राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे १५१.२ मिमी, कुलाबा येथे १२८ मिमी, तर लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पाऊस झाला. ताम्हिणी येथे ५८० मिमी, अंबोना येथे ५३७ मिमी, जुहू विमानतळ येथे ३२५ मिमी, माथेरान येथे ३०२ मिमी, विभाग येथे ३०५ मिमी, कर्जत येथे २९१.५ मिमी, निलशी येथे २७५ मिमी, भिवपुरी येथे २६६ मिमी, मुळशी येथे २३० मिमी, भाईंदर येथे १८८.५ मिमी आणि पनवेल येथे १८२.५ मिमी पावसाची नोंद झाली.
माथेरान, लोणावळा, खोपोली आणि लोहगड परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि NDRF यांच्याशी समन्वय साधून बचावकार्य सुरू असून, SEOC कडून GEO-DSS प्रणालीद्वारे धोक्याचे विश्लेषण करून सातत्याने इशारे दिले जात आहेत.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. खोपोली येथे पाणी साचल्यामुळे जुना मुंबई-पुणे महामार्ग बंद आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. मंकी हिल ते ठाकूरवाडीदरम्यान दरडी कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली असून रस्ते आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
मावळ तालुक्यातील घोरावाडी (तळेगाव दाभाडे) येथे पुराच्या पाण्यात २५ प्रवाशांसह एक बस अडकली होती. NDRF च्या पथकाने सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. तसेच मावळमधील पाटण येथे दरड कोसळून एक घर गाडले गेले असून तीन ते चार जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तेथे बचावकार्य सुरू आहे.
मुंबईतील मानखुर्द येथे झोपडपट्टीवर इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली.
Heavy Rain Batters Maharashtra; 17 NDRF Teams Deployed Across the State
महत्वाच्या बातम्या