विश्वजीत भालेराव
पुणे: River front बहुप्रतिक्षित अशा मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा, संगमवाडी येथील नदीवरील पुलापासून बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंतचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे संगमवाडी येथील नदीकाठचा जॉगिंग ट्रॅक वापरासाठी खुला केला जाणार आहे. या भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गाकडून या ट्रॅकचा वापर सुरू करण्यात आला आहे. सकाळी आणि संध्याकाळी याचा वापर फिरण्यासाठी केला जात आहे.River front
नदीकाठ सुधार योजनेच्या माध्यमातून संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. संगमवाडी येथील संगम घाटाचे काम थोडे राहिले आहे. घाटावर प्रवेश मार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. अशी माहिती पुणे महापालिकेचे प्रशांत वाघमारे, शहर अभियंते यांनी दिली आहे.River front
पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कधी?
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याचे उद्घाटन होणार आहे.शहरातून वाहणाऱ्या नदीचे सौंदर्य वाढावे यासाठी मुळा-मुठा नदीकाठचा विकास महापालिकेच्या वतीने केला जात आहे. एकूण अकरा टप्प्यांमध्ये हे काम केले जाणार आहे. या कामापैकी पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंतचे सुमारे ३.७ किलोमीटर अंतराचे काम महापालिकेने सुरू केले होते. हे काम करताना संगमवाडी येथील स्मशानभूमीजवळील नदीकाठालगत असलेली जागा संरक्षण विभागाच्या ताब्यात होती. ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले.बंडगार्डन येथील गणेश घाटापासून या कामाची सुरुवात करण्यात आली होती.
सर्वसाधारणपणे एका वर्षभरात गणेश घाट परिसरातील सुमारे ७०० मीटरचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे. या भागात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, तसेच विविध ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. हीच पद्धत संगमवाडी येथे असलेल्या पाटील इस्टेट वसाहतीच्या जवळ असलेल्या भागापर्यंत राबविण्यात आली आहे.
संगमवाडी ते बंडगार्डन गणेशघाटाचा पालटलेलं रूप!
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहत येणाऱ्या मुळा-मुठा नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो, त्या संगमवाडी भागात महापालिकेने नदीपात्राच्या दिशेने उतरत जाणाऱ्या पायऱ्या केल्या आहेत. तेथे सौंदर्य खुलावे यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महापालिकेने सुशोभीकर केल्यामुळे सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिक येथे एकाच वेळी बसू शकतात. वरच्या बाजूला लाल मातीच्या जॉगिंग ट्रॅकशेजारी सायकल ट्रॅकसारखी
रचना करण्यात आली आहे. तसेच, येथे विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून, नदीपात्रात पिचिंग करून त्यावर फुलझाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे संगमवाडिकचे रूप पालटले आहे.
या कामामुळे आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी येथे सकाळी तसेच संध्याकाळी फिरायला सुरुवात केली आहे. यामध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या अधिक आहे.
उद्घाटन होण्याआधीच नागरिकांनी केल्या सूचना!
या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना रस्ता ओलांडावा लागणार आहे. या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहनांची ये-जा असते. त्यामुळे वाहनांची गती कमी करण्यासाठी येथे गतिरोधक अथवा पादचारी मार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
River front development, First Phase Nears Completion; Inauguration Scheduled for the Second Week of February!
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष; ईडी मनी लॉन्डरिंग केसला पूर्णविराम
- गुजरातच्या दारूबंदीच्या धर्तीवर गुटखा बंदीसाठी स्वतंत्र कायदा, नरहरी झिरवाळ यांची माहिती
- उध्दव ठाकरे यांच्या शिवसैनिकाला महापाैरपदासाठी पाठिंबा द्या, भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन
- महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर ; महिनाअखेरीस सत्तास्थापना

