Jalindar Supekar: जालिंदर सुपेकर जेलमध्ये आरोपींना म्हणाले ३०० कोटी रुपये दे, आमदार सुरेश धस यांचा आरोप

  विशेष प्रतिनिधी

बीड : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप झालेलं पोलीस महानिरीक्षक (आयजी) जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी जेलमध्ये आरोपींना ३०० कोटी रुपये दे, असे म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे, असे धस यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये एका सभेत बोलत असताना सुरेश धस म्हणाले की, आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख १ लाख रुपये चेकद्वारे घेतो. ५० हजारांचा मोबाइल घेतो, यापेक्षा दुर्दैव काय असावे. जालिंदर सुपेकरबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. जेलमध्ये आरोपींना ३०० कोटी रुपये दे, असे म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. नातेवाईकांच्या सुनेकडून पैसे मागता, याचा अर्थ सुपेकर हा १०० टक्के फॉल्टी आहे

धस म्हणाले की, नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नाही. गोष्टी किती खालच्या थराला गेल्यात याचे हे उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची १५० कोटींची मालमत्ता आहे. आता ही प्रॉपर्टी जाळायची की पेटवायची. असे लोक तुरुंगातून कितीही वर्षांनी बाहेर आले तरी समाज त्यांच्यावर शेण हाणणार आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर जाऊन शेण फेकले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी टोमॅटो फेकले. नुसते टोमॅटो हाणून उपयोग नाही, यांच्यावर कवटं हाणायला हवेत. भविष्यात कुणी केले नाही, तर आष्टी मतदारसंघाने याबाबत तयारीत राहावे. हगवणे कुटुंब जामिनावर सुटले तर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवटं तयार ठेवा. सापडले तर सुपेकरांबाबतही हेच करायला हवे.

वैष्णवीचा नवरा शशांक आणि दीर सुशील यांनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे याच्याविरोधात वारजे तर सुशील हगवणे कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हगवणे कटुंबीय पुणे ग्रामीणमधील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात. त्यामुळे त्यांनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलीसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलीसांनी दोघांचेही अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर दोघांनी ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते दिले. त्यासाठी ते भाड्याने राहत असल्याचे कागदपत्रे दाखवण्यासाठी भाडे करार तयार केला. शशांकने वारजेला तर सुशीलने कोथरुडला रहात असल्याचा पत्ता सादर केला. त्याआधारे पुणे पोलीसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी करण्यात आली. याप्रकरणी दोघां भावांवरती गुन्हा दाखल आहे, या प्रकरणामध्ये हगवणेंचा पाहुणा आणि शशांक, सुशील यांचा मामा जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar)यांचा सहभागही समोर आला आहे.

 

Jalindar Supekar told the accused in jail to pay Rs 300 crore, alleges MLA Suresh Dhas

महत्वाच्या बातम्या