Sudhakar Badgujar : पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, हकालपट्टी झाल्यावर सुधाकर बडगुजर यांचा ठाकरे गटाला इशारा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : “पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही. पक्षाने जी कारवाई केली, त्यावर मी योग्य वेळी उत्तर देईन, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिला आहे.

नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेल्या सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. यावर बडगुजर म्हणाले, बुधवारी (4 जून) पक्षाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते पण मी नाशिक बाहेर असल्याने या पत्रकार परिषदेला गेलो नाही. त्याबाबत मी जिल्हाध्याक्षांना सांगितले होते. पण मी जर फक्त मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणून माझ्यावर जर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे.



सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) म्हणाले की, “पक्षाने कोणाची हकलपट्टी करावी? कोणाला पक्षात ठेवायचे? हा पक्षाचा निर्णय आहे. त्यावर मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. योग्य वेळ आली की मी माझी प्रतिक्रिया देईन. माझी पुढची भूमिका काय? हे मी वेळ आल्यावर सांगेन.पक्षातून हकालपट्टी होईल अशी कोणतीही कुणकुण लागलेली नव्हती. मी पक्षातील भूमिकांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पण नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर ते योग्य नाही. पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतो पण आता हकलपट्टी झाली आहे तर पक्षप्रमुखांची भेट घेण्याचा प्रश्नच नाही. अचानक निर्णय झाला, पक्षाचा निर्णय होता, पक्षाने घेतला. इतर कोण कोण नाराज आहेत त्यांची नावं मी घेणार नाही.

सुधाकर बडगुजर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.

पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांच्याकडे 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपवण्यात आले. त्यानंतर नाशिक महापालिकेची सत्ता मनसेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. पण यावेळी त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाने सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली. पण, तेव्हादेखील त्यांचा पराभव झाला. सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते. आता त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली.

Expressing displeasure in the party is not a crime, Sudhakar Badgujar warns Thackeray group after expulsion

महत्वाच्या बातम्या