Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकारची सहमती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा करण्याच्या मागणीवर विरोधकांकडून केंद्र सरकारला घेरण्याची तयारी सुरु होती. मात्र विरोधकांना त्याची संधी न देता सरकारने ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासही सहमती दर्शविली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.

रिजिजू म्हणाले की, अधिवेशनादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा केली जाईल. प्रत्येक अधिवेशन विशेष आहे आणि आम्ही ऑपरेशन सिंदूरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करू. सरकारला सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. आम्ही विरोधकांशी याबाबत चर्चा केली, आशा आहे की, या बाबतीत सर्वजण एकसारखी भूमिका घेतील. पावसाळी अधिवेशनात नियमांनुसारच सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

एकीकडे विरोधक सतत सरकारकडे ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत होते. मंगळवारी १६ विरोधी यासाठी पक्षांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले होते. पण, आता सरकारने पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. म्हणजेच, विरोधकांच्या सततच्या मागणीनंतरही ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) कोणतेही विशेष अधिवेशन होणार नाही. जी काही चर्चा होईल, ती सर्व पावसाळी अधिवेशनातच होईल.

पहलगामचा हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला तसेच तेथे पोसला जात असलेल्या दहशतवादाला जशास तसे उत्तर दिले. मात्र सरकारने या प्रकरणी विरोधकांना विश्वासात घ्यावे. तसेच या मोहिमेमुळे नेमकं काय साध्य झालं, हे सरकारने स्पष्ट करावे. यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन याबाबत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Government agrees to discuss Operation Sindoor

महत्वाच्या बातम्या