Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर ना घरके, ना घाटके, भाजपमध्ये घेण्यास आमदार हिरेंचा तीव्र विरोध

विशेष प्रतिनिधी

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आज सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र आमदार सीमा हिरे यांनी त्यांना तीव्र विरोध केल्याने ना घरके, ना घाटके अशी त्यांची अवस्था झाली आहे.

नाशिकमधील भाजपा आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या गुन्ह्यांची कुंडली काढत त्यांच्या भाजपा प्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. हिरे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे उद्योग आघाडीचे पदाधिकारी प्रदीप पेशकर आणि विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते. सीमा हिरे म्हणाल्या की, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मी बडगुजर यांचा पराभव केला आहे. मात्र नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांची दहशत आहे. ते भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याविरोधात 17 गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर पार्टीमध्ये डान्स केला होता. एवढेच नाही तर भाजपा नेते बावनकुळे यांच्या प्रदेश दौऱ्यात त्यांच्या कॅसिनोचा फोटो देखील बडगुजर यांनीच व्हायरल केला होता. नारायण राणे यांना भरल्या ताटावरून उठविण्याचे कामही बडगुजर यांनीच केले होते.

सीमा हिरे म्हणाल्या की, सुधाकर बडगुजर महापालिकेत टेंडर भरतात आणि नंतर टेंडर मागे घेण्यासाठी आर्थिक तडजोड करतात. याशिवाय त्यांच्या मुलाने एका व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे. या गुन्ह्यांबाबत त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. ही कारवाई टाळण्यासाठी आणि गुन्हे लपविण्यासाठी त्यांना भाजपामध्ये यायचं आहे. पण भाजपा पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. पक्षात लोकशाही आहे. मात्र बडगुजर यांच्यामुळे भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना पक्ष सोडावा लागला आहे. त्यामुळे प्रतिमा मलीन असलेल्या व्यक्तीला किती मतदान झाले आहे, ही गोष्ट पाहून पक्षश्रेष्ठी विचार करतील, असे त्यांनी म्हटले.

आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही शतप्रतिशत भाजपा असा नारा दिला आहे. भाजपाचे सर्व नगरसेवक निवडून येतील यासाठी आमचे जोरदार प्रयत्न आणि परिश्रम सुरू आहेत. अशावेळी बडगुजर यांचा भाजपा प्रवेश झाल्यास पक्ष बॅकफुटवर जाईल. त्यामुळे कोणत्याही स्थितीत बडगुजर यांना भाजपामध्ये प्रवेश देऊ नये, यावर आम्ही ठाम आहोत. बडगुजर यांची चर्चा होताच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी फोन करून त्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध असल्याचे कळविले आहे. कारण त्यांच्यावर दाखल गुन्हे पाहता आणि डागाळलेली प्रतिमा पवित्र होण्यासाठीच त्यांची भाजपामध्ये येण्याची त्यांची इच्छा दिसते आहे. सध्या त्यांच्या प्रवेशाची केवळ चर्चा असली तरी याबाबत पक्षात अथवा पदाधिकाऱ्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र बडगुजर यांना पक्षात घेण्यास आमचा विरोध असेल, असे हिरे यांनी स्पष्ट केले.

MLA Hire strongly opposes taking Sudhakar Badgujar into BJP

महत्वाच्या बातम्या