Maharashtra Weather Update : राज्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update) राज्यातील काही जिल्हे तसेच घाटमाथ्यावर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी केला आहे.

मागील काही दिवसांपासून मान्सूनची गती मंदावली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाडा भागांत पुन्हा वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. गुरुवारी कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.



मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या गुजरात राज्यात हवेच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, ती स्थिती अद्यापही कायम आहे. यासोबतच बांगलादेशाच्या उत्तर भागातही अशीच चक्रीय स्थिती आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत आहे. या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, सकाळच्या सुमारास हवामानात ऊन पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मागील आठवड्यात राज्यभरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. मुंबई, रायगड, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या सर्वच भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबई व राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे.

Chance of rain with gusty winds in many parts of the state, Meteorological Department issues ‘Yellow Alert’

महत्वाच्या बातम्या