Dino Morea : मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील गैरव्यवहार, अभिनेता डिनो मोरियाच्या घरावर ईडीचा छापा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मिठी नदीचा (Mithi River) गाळ काढण्याच्या प्रकल्पातील अनियमितता आणि निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाच्या (Dino Morea) मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत.



बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या जागेवर छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी त्याची याआधी मुंबई पोलिसांकडून चौकशीसुद्धा करण्यात आली होती. डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं होतं. डिनो मोरिया (Dino Morea) हा शिवसेना (ठाकरे गट) युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.

मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. यात मुंबई आणि केरळमधील कोची इथल्या ठिकाणांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास आठ तास चौकशी केली होती. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात 2019 आणि 2022 या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार आहेत. त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे.

ED raids actor Dino Morea’s house over irregularities in Mithi river siltation project

महत्वाच्या बातम्या