Ajit Pawar : तुतारीला रामराम, घड्याळावर प्रेम! शरद पवार गटाच्या आमदाराच्या जाहिरातीत अजित पवारांचे चिन्ह

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या दोन गटांमधील संघर्षात आता आमदार थेट अजित पवारांशी (Ajit Pawar) जवळीक साधू लागले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी आपल्या अलीकडील जाहिरातीत पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘तुतारी’ टाळून थेट अजित पवार गटाचे ‘घड्याळ’ हे चिन्ह वापरले आहे.

राजू खरे यांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अभिनंदन केले असून, या जाहिरातीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकतात. शरद पवार किंवा तुतारीचा कुठेही उल्लेख नाही.

ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील राजू खरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक वृत्तपत्रांत जाहिराती दिल्या होत्या. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना आमंत्रित करून, त्या निमित्ताने ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरही शरद पवार आणि तुतारी गायब होती. एकनाथ शिंदे आणि गोगावले यांचे फोटो ठळकपणे झळकत होते.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस राजू खरे यांच्या या पक्षविरोधी कृतीकडे दुर्लक्ष करणार का? की त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करणार, असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे.

Goodbye to the trumpet, love the clock! Ajit Pawar’s symbol in the advertisement of the Sharad Pawar group’s MLA

महत्वाच्या बातम्या