खासगी शिकवणीतील सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलीला बेदम मारहाण; पित्याच्या मारहाणीने मृत्यू

विशेष प्रतिनिधी

सांगली : नीट ( NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी खासगी शिकवणी लावलेल्या एका बारावीतील विद्यार्थिनीला सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे वडिलांनी घरातच बेदम मारहाण केली. मुख्याध्यापक असलेल्या या वडिलांच्या अमानुष मारहाणीत त्या मुलीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी या शिक्षक बापाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे घडली आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव साधना धोंडीराम भोसले (वय 17) असे आहे. ती नेलकरंजी येथील विज्ञान शाखेची बारावीची विद्यार्थीनी होती. तिचे वडील धोंडीराम भोसले हे गावातीलच एका खासगी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून, त्यांच्या पत्नी प्रीती भोसले या गावच्या माजी सरपंच आहेत. धोंडीराम भोसले यांचे वडील भगवान भोसले हे माजी पोलिस पाटील होते.

साधना ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवत शाळेतील पहिल्या क्रमांकावर आली होती. तिने डॉक्टर व्हावे असे कुटुंबियांचे स्वप्न होते. तिने नीट परीक्षेची तयारी सुरू केली होती. यासाठी तिला खासगी शिकवणीस लावण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्या शिकवणीमध्ये झालेल्या सराव परीक्षेत तिच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे समजल्यावर वडील धोंडीराम भोसले हे संतापले.

20 जूनच्या रात्री 9.30 वाजता, संतापलेल्या वडिलांनी घरात असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने मुलीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तस्त्राव होत असल्याने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

प्रारंभी मुलीचा मृत्यू हा अपघाती असल्याचे भासवण्याचा प्रयत्न वडिलांनी केला होता. परंतु शवविच्छेदन अहवालात डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वडील धोंडीराम भोसले यांच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि रविवारी त्यांना अटक करण्यात आली.

Girl brutally beaten for getting low marks in private tutoring practice exam; dies after being beaten by father

महत्वाच्या बातम्या