विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री आदर्श शाळा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. सीएम श्री शाळा योजने अंतर्गत जवळपास 5 हजार शाळा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच 10 हजार शाळेतील “एक वर्ग आदर्श वर्ग” करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी कला, क्रीडा या विषयांना प्राधान्य द्यावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse ) यांनी केले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने डॉ. रफीक झकेरिया कॅम्पस येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, शिक्षण संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
10 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर असून या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे सांगून दादा भुसे (Dada Bhuse ) म्हणाले,
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आता संपूर्ण देशातील विविध शाळांमध्ये शिकवला जाणार आहे. दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण देशात शिकवला जावा असा विचार मांडला. त्यावेळी तत्काळ त्यांनी मान्यता दिली असून येणाऱ्या काळात देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. देशपातळीवर मराठी भाषेला मानाचे स्थान मिळावे. सीबीएसई अभ्यासक्रमात राज्यभाषेला प्राधान्य देत राज्यातील सीबीएसई शाळेत मराठी बंधनकारक असणार आहे. राष्ट्रगीतानंतर राज्यगीताचे गायन सन्मानाने करण्यात येणार आहे.
भुसे म्हणाले की, राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू होताना शालेय विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अत्यंत छान पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वांचा सहभाग निश्चितच महत्वाचा ठरला. पालकांना अपेक्षित असलेला गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्व मिळून समर्पित भावनेने उद्याच्या भारताचा नागरिक घडविण्यासाठी काम करू. गावपातळीवरील शाळेत 15 विषयांच्या विविध समित्या होत्या त्या समित्यांचे 4 समित्यांमध्ये रुपांतर केले. 4 समित्यांचे सक्षमीकरण करून यामध्ये लोकसहभाग वाढवावा लागणार आहे. शालेय पातळीवर भौतिक सुविधांचा अभाव लक्षात घेत स्वच्छ पाणी, शालेय स्वच्छता, इमारती, क्रीडांगण, प्रयोगशाळा, वाचनालय या सुविधा निश्चितपणे टप्प्याटप्याने विकसित करणार आहे.
वारे गुरूजींच्या शाळेला जगातील पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळाले. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, राज्यात ध्येयाने काम करणारे अनेक आयडॉल शिक्षक आहेत. आपण अशा शिक्षकांच्या पाठीशी उभे राहिले तर ते आणखी गतीने काम करतील. येणाऱ्या कालावधीत अशा आयडॉल शिक्षकांचा सहभाग घेत त्यांनी ज्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम केले त्यांचे ते काम त्या केंद्रात, तालुक्यात प्रत्येक गावापर्यंत पोहचले पाहिजे, यादृष्टीने आपण सर्व मिळून प्रयत्न करू.
प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा प्रबोधिनीची शाळा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून आपल्या शाळा वाढल्या पाहिजेत यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन भुसे यांनी केले.
CM Shri Adarsh School Scheme in the state on the lines of PM Shri School; Information from School Education Minister Dada Bhuse
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी