Raj Thackeray मराठीवर कुठलीही तडजोड नाही; हिंदी सक्ती हे स्लो पॉयझन, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या अस्मितेवर कुठलीही तडजोड मान्य नाही, असा स्पष्ट इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. सरकारने हिंदी सक्ती संदर्भातील दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी आयोजित मोर्चा रद्द करून “विजयी मेळाव्याची” घोषणा केली. Raj Thackeray

पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर अजिबात तडजोड केली जाणार नाही. सरकारने समिती नेमली तिचा अहवाल काहीही येवो, पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. हे मराठीवरील संकट म्हणूनच पाहायला हवे. त्याला राजकीय लेबल लावू नका. ५ तारखेला मोर्चा ऐवजी मेळावा होईल. या मेळाव्यात आणखी बोलेनच. हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करायला सरकारला भाग पाडले. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे, साहित्यिकांचे, पत्रकारांचे आणि राजकीय पक्षांचे आभार आहे.

हिंदी राष्ट्रभाषा नाही. ५ जुलैला जर मोर्चा निघाला असता तर तो न भूतो असा झाला असता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण अनेकांना आली असती. या विषयावर कुठलीही तडजोड होणार नाही. हे स्लो पॉयजनसारखे आहे, हळूहळू गोष्टी आतमध्ये पेरायच्या. हा प्रयत्न सरकारने करून पाहिला परंतु तो अंगाशी आला. समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा किंवा नाही याचे आम्हाला देणेघेणे नाही. या गोष्टी आम्ही मान्य करणार नाही. परत या गोष्टी सरकारने आणूच नये. हिंदी आणण्याचा का प्रयत्न केला जातोय हे माहिती नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही. ती एका प्रांताची भाषा आहे. उत्तर भारतातील अनेक जण इथे येतात मग तिथे मराठी शिकवली पाहिजे. दीडशे वर्षाची भाषा ३०० वर्षाच्या भाषेवर वरचढ ठरवण्याचा प्रयत्न झाला ते मान्य होणार नाही.



सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर संजय राऊतांचा फोन आला होता. मोर्चा रद्द झाला तरी विजयी मेळावा ५ जुलैला होईल. हा विजय मराठी माणसाचा आहे. त्या दृष्टीने या मेळाव्याकडे पाहिले पाहिजे. ज्याप्रकारे वर्तमानपत्र, टेलिव्हिजन चॅनेलने हा विषय लावून धरला त्याबद्दल सर्वांचे आभार आहे. ५ तारखेचा विजयी मेळावा कुठे होईल, केव्हा होईल हे आमच्या नेत्यांशी आणि त्यांच्याशी बोलून ठरवले जाईल. मोर्चा असो वा विजयी मेळावा याला राजकीय पक्षाचे लेबल लावू नका. युती, आघाडी होत राहील मराठी भाषेवर संकट म्हणूनच याकडे पाहावे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला हीच विनंती आहे. मराठी भाषा, मराठी माणूस यावर तडजोड होता कामा नये. सर्व बाजूने महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी माणसाने आजूबाजूला काय गोष्टी घडतायेत त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

मराठीच्या मुद्द्यावर कोणताही झेंडा नसेल, मराठी अजेंडा असेल हे मी आधीच जाहीर केले होते. राज्य सरकारमधील अनेक मंत्री, आमदारांनी या निर्णयाला विरोध केला. अजित पवारांनीही याला विरोध केला हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. मग जाधव येऊ द्या नाहीतर अजून कुणी येऊ द्या. महाराष्ट्रात ज्याप्रकारे मराठी माणसांनी विरोध केला आहे याची जाणीव जाधव यांना असावी. महाराष्ट्रात खूप प्रश्न तुंबले आहेत. भाषेवर उगाच विषय आणू नका. विधानभवनात जे विरोधक आहेत त्यांनी अधिवेशनात या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये. जे इतर विषय आहेत त्यावर बोलावे. शैक्षणिक अजून बऱ्याच समस्या आहेत. शिक्षकांना पगार नाही. शिक्षकांवर इतर बोझा टाकला जातो यावर विरोधकांनी लक्ष घालावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

There is no compromise on Marathi; Hindi compulsion is a slow poison, Raj Thackeray warns the government

महत्वाच्या बातम्या