Raj-Uddhav : राज – उध्दव युतीची बातमी लवकरच, मनसे- शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj-Uddhav  मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज व उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीची पुढील 1-2 दिवसांत बातमी देऊ, असा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर ते बाेलत हाेते.Raj-Uddhav

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष झपाटून कामाला लागलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत व आमदार अनिल परब यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी युती करण्याच्या मुद्यावर चर्चा केली. यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अनिल परब यांनी युतीची घोषणा कधी करायची याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवणार असल्याचे स्पष्ट केले.



अनिल परब म्हणाले, युतीची अधिकृत घोषणा केव्हा करायची याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवतील. त्याची तारीख लवकरच कळवली जाईल. सद्यस्थितीत सर्व गोष्टी चर्चेत आहेत. चर्चेअंती शेवटचा निर्णय होईल. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल. कोणता पक्ष आमच्यासोबत असेल किंवा आमची कुणासोबत चर्चा सुरू आहे याविषयी मी आत्ताच काही सांगू शकत नाही. एकदा यासंबंधीच्या चर्चेला अंतिम स्वरुप मिळाले की आम्ही त्याविषयी कळवू. त्यावर आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही.

मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल परब यांनी म्हटले की, काँग्रेसच्या बाबतीत मी आत्ता आपल्याला काहीच सांगू इच्छित नाही. या सगळ्या गोष्टींना अंतिम स्वरुप आले की, आम्ही कळवू. चर्चेतील तपशील सांगितले जात नाहीत. निर्णय सांगितला जातो. वर्षा गायकवाड यांचे जे काही म्हणणे आहे, त्याचा विचार करून आम्हाला एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. आम्ही आजही महाविकास आघाडीत आहोत आणि आमचा शेवटपर्यंत असाच प्रयत्न राहणार आहे की, महाविकास आघाडी एकत्र राहावी. वर्षा गायकवाड यांचे ते मत आहे. आमचे मत असे आहे की, महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे, असे अनिल परब म्हणाले.

आम्ही आधीच महाविकास आघाडीचा एक भाग आहोत. आमची इच्छा आहे की, महाविकास आघाडी अभेद्य राहावी. आता यात काँग्रेस काय निर्णय घेते, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्याचा अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो. ज्या दिवशी अंतिम निर्णय होईल, त्या दिवशी आपल्याला कळवू. काँग्रसेच्या हायकमांडशी चर्चा करायची की नाही, याबाबत आमचे नेते निर्णय घेतील, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

आता निवडणुका लागल्या आहेत. 15 तारखेला त्याचा फैसला होणार आहे. त्यात मुंबईची जनता कुणावर प्रेम करते किंवा कुणावर करत नाही हे ठरेल. त्यावर आताच चर्चा करण्याची गरज नाही. आमच्यावर आरोप करणारे आरोप करतील. पण मुंबई 25 वर्षे शिवसेनेला मिळाली. त्यामुळे आमचे मुंबईवर प्रेम आहे व मुंबईकरांचेही आमच्यावर प्रेम आहे हे स्पष्ट आहे. त्याचा लवकरच निर्णय लागेल, असे परब या प्रकरणी भाजपची टीका फेटाळताना म्हणाले.

तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड राखीव झाला होता. तेथून त्या निवडणूक लढवू शकत नव्हत्या. त्यांनी निर्णय का घेतला? हे आम्ही सांगू शकत नाही. पण त्यांच्यावर दबाव होता असे मला वाटत नाही. पण त्यांचे सासरे विनोद घोसाळकर आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांना ओळखतो. ते आमचे मूळ कार्यकर्ते आहेत, असे परब म्हणाले.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी युतीची घोषणा 1-2 दिवसांत होणार असल्याचे सांगत म्हणाले, हिंदुत्त्व हा विषय ठाकरे कुटुंबाला कुणीही शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे असो किंवा इतर कुणी असू असो. बाळासाहेबांचे हिंदुत्त्वासाठी 6 वर्षे निलंबन झाले होते. बाळासाहेबांनी हिंदुत्त्वावर निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिले. त्यांनी हिंदुत्त्व शिकवले. मशीद पडली तेव्हा त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कुणीही हिंदुत्त्व शिकवू नये.

News of Raj-Uddhav alliance coming soon, MNS-Shiv Sena Thackeray group office bearers discuss

महत्वाच्या बातम्या