विशेष प्रतिनिधी
बारामती : विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार? असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांकडून अजित पवार यांनी दाेन्ही गटांकडून विलीनीकरणावर शिक्कामाेर्तब केल्याचे दावे केले आहेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते की, दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार असत्या तर अजित पवार यांनी त्यांना याबाबत सांगितले असते. ते माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्याआधी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.
या घडामोडींमुळे शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा नवा राजकीय वाद उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादींच्या भवितव्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील यांच्या घरी बैठक झाल्याचा दावा एकीकडे, तर त्याचे खंडन दुसरीकडे, अशा विरोधाभासी भूमिकांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजितदादा गटातील नेते विलीनीकरणाच्या चर्चांना नकार देत असताना शरद पवारांनी सूचकपणे बैठकीचा उल्लेख केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजितदादा गटाचे नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शरद पवार हे मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. दोन दिवस संसदीय कामकाजात सहभाग घेतल्यानंतर ते पुन्हा बारामतीकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. येणाऱ्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.