महाराष्ट्रात अवकाळीचा तडाखा; विदर्भ–मराठवाडा–पश्चिम महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसाचा जोर

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यात सध्या अवकाळी पावसाने जोरदार पुनरागमन केल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

गेल्या २४ ते ४८ तासांपासून अकोला, वाशिम, नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या आकाराच्या गारांचा मारा झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, कापूस तसेच फळबागा यांना याचा मोठा फटका बसल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर येत आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना, बीड, परभणी, नांदेड या भागातही मुसळधार पावसासह गारपीट झाल्याचे वृत्त आहे. अनेक शेतांमध्ये उभ्या पिकांवर गारांचा मारा झाल्याने पिके आडवी पडली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काही ठिकाणी घरांच्या पत्र्यांवरही गारांचा जोरदार मारा झाल्याने नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागात अल्पावधीतच जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरांसह ग्रामीण भागातही वाऱ्याचा वेग वाढल्याने झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.



या पार्श्वभूमीवर पुणे हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी सानप यांनी सांगितले की,” वातावरणातील आर्द्रता, तापमानातील अचानक वाढ आणि पश्चिमेकडून येणाऱ्या हवामान प्रणालीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसाच्या उष्णतेनंतर सायंकाळी ढगांची निर्मिती होऊन वादळी पाऊस आणि गारपीट होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील गारपीट आणि पावसाचा तडाका बसू शकतो”.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी शक्य ती काळजी घ्यावी, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अचानक बदलणाऱ्या या हवामानामुळे एकीकडे गारपीट आणि पावसाचा तडाखा, तर दुसरीकडे येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवस हवामानातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Unseasonal weather hits Maharashtra; Hailstorm and unseasonal rains in Vidarbha-Marathwada-Western Maharashtra

महत्वाच्या बातम्या