विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : Rohit Pawar राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असतानाच रोहित पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.Rohit Pawar
सततच्या अन्नत्यागामुळे त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे. मात्र, त्यांचा रक्तदाब सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही कर्जमाफीच्या जाचक अटी हटवल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.Rohit Pawar
आंदोलनस्थळावरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत, “गेल्या तीन दिवसांपासून शासन आणि कृषिमंत्र्यांकडून चर्चेसाठी निमंत्रणे येत आहेत. मात्र केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवता येणार नाही. मुख्यमंत्री किंवा सरकारने अधिकृतपणे जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” असे स्पष्ट केले.
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना रोहित पवार म्हणाले, “आम्हाला सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची शिकवण मिळाली आहे. माझ्या आंदोलनामुळे आई, पत्नी आणि मुलांना चिंता वाटत आहे. ते आज मला भेटण्यासाठी पंढरपुरात येणार आहेत.”
दरम्यान, कल्याणहून विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या एका महिलेने आंदोलनस्थळी येऊन रोहित पवार यांना थेट सल्ला दिला. “शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. पण सतत कर्जमाफीची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. तुमचे सरकार आल्यावर पूर्ण कर्जमाफी द्या. सध्या सरकार आर्थिक अडचणीत आहे हे माहीत असूनही असे आंदोलन करणे योग्य नाही,” असे ती म्हणाली.
तिने रोहित पवार यांच्या उपोषणावरही प्रश्न उपस्थित करत, “ते ठणठणीत दिसत आहेत. त्यांनी अन्नत्याग केला आहे असे वाटत नाही,” अशी टिप्पणी केली. या वक्तव्यानंतर आंदोलनस्थळी काही काळ शांतता पसरली होती.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी विविध पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते पंढरपुरात दाखल होत आहेत. यामध्ये संजय राऊत, राजू शेट्टी, महादेव जानकर, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हेही आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवार यांची विचारपूस करणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रोहित पवार यांनी सरकारला आजपर्यंतची मुदत दिली आहे. जर आज संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय जाहीर झाला नाही, तर सोमवारी सकाळी ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीवर जाऊन आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेतील तांत्रिक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांची मर्यादा घालण्याची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच पुढील कर्जफेडीची सक्ती न करता प्रोत्साहनपर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यातील चर्चेला अद्याप ठोस दिशा मिळालेली नसल्याने पंढरपूरातील हे उपोषण राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा विषय ठरत आहे.
Rohit Pawar’s Fast for Farm Loan Waiver Enters Third Day; Health Deteriorates, Government Given Final Warning
महत्वाच्या बातम्या