विशेष प्रतिनिधी
मुंबई : El Niño भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यातील पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने पाणीटंचाई टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील धरणे, जलाशय आणि अन्य जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याच्या उद्देशाने सुरू असलेली सर्व सिंचन आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी दिले आहेत.El Niño
यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले असून, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.El Niño
३१ ऑगस्टपर्यंत अखंडित पाणीपुरवठ्याचे लक्ष्य
शासनाच्या परिपत्रकानुसार, सर्व जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील धरणे व जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा. अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या साठ्याचा वापर इतर कोणत्याही अकृषिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी करता येणार नाही.
शहरी तसेच ग्रामीण भागात ३१ ऑगस्टपर्यंत अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू राहावा, यासाठी जिल्हास्तरावर विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
बेकायदेशीर पाणी उपशाविरोधात संयुक्त कारवाई
धरणे, कालवे, नद्या आणि तलावांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके नियमित गस्त घालून अनधिकृत मोटारी, पंप, पाईपलाईन आणि इतर उपकरणांची तपासणी करतील.
१२ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार दोषींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
साप्ताहिक अहवाल सादर करणे बंधनकारक
पाणी नियोजनात कोणतीही हलगर्जी होऊ नये यासाठी विभागीय आयुक्त, पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना दर आठवड्याला शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अहवालात पाणीसाठ्याची स्थिती, सिंचन आवर्तने स्थगित करण्याची अंमलबजावणी आणि बेकायदेशीर पाणी उपशाविरोधातील कारवाईचा तपशील नमूद करावा लागणार आहे.
‘एल निनो’ ही विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा वाढण्याची नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होतो आणि भारतासह अनेक देशांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते. परिणामी दुष्काळ, पाणीटंचाई आणि कृषी क्षेत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने पाण्याचा काटेकोर वापर करण्यावर भर दिला असून, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
Irrigation Water Releases from Dams Halted Across State Amid El Niño Threat; Drinking Water Given Top Priority
महत्वाच्या बातम्या