शब्द पाळला नाही तर रस्त्यावरची मोठी लढाई, रोहित पवार यांचा सरकारला इशारा

विशेष प्रतिनिधी

पुणे : शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी दूर करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदाेलन मागे घेतल्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे. शब्द पाळला नाही तर रस्त्यावरची माेठी लढाई लढली जाईल असे त्यांनी म्हटले आाहे.

राेहित पवार यांच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात आंदोलनस्थळी राेहित पवार यांची भेट घेतली. तेथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच २२ जूनपूर्वी मुंबईत विशेष बैठक घेतली जाईल आणि या बैठकीत कर्जमाफीतील जाचक अटीशर्ती काढून टाकण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले. त्यानंतर राेहित पवार यांनी आंदोलन मागे घेतले. या निर्णयावर स्पष्टीकरण देताना रोहित पवार म्हणाले, “हे अन्नदात्यासाठीचे आंदोलन होते. आंदोलन अधिक ताणून धरले असते आणि हाती काही लागले नसते, तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असते; जे आम्हाला होऊ द्यायचे नव्हते. आता सरकारने विठुरायाच्या पवित्र भूमीत येऊन अटी काढण्याचा शब्द दिला आहे, ते तो पाळतील अशी अपेक्षा आहे. मात्र, बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर यापुढे रस्त्यावरची मोठी लढाई लढू .



ट्विट करत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव दिले, परंतु त्यात अशा जाचक अटी टाकल्या ज्यामुळे बहुतांश शेतकरी वंचित राहणार होते. हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचाच अवमान होता आणि हीच गोष्ट आम्ही आंदोलनातून सरकारच्या निदर्शनास आणून दिली. सुरुवातीला अटी बदलण्यास नकार देणारे सरकार आता या अटी काढण्यास तयार झाले, हेच या आंदोलनाचे मोठे यश आहे.”

“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे,” अशी भूमिका घेत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी राज्यातील दिग्गज शेतकरी नेत्यांचे एक शिष्टमंडळ जाहीर केले आहे. यामध्ये राजू शेट्टी, शशिकांत शिंदे, कॉ. अजित नवले, वामनराव चटप, महादेव जानकर, प्रवीणदादा गायकवाड, रविकांत तुपकर आणि हर्षवर्धन सपकाळ या नेत्यांचा समावेश असणार आहे.

Rohit Pawar warns the government that if the promise is not kept, there will be a big fight on the streets.

महत्वाच्या बातम्या