विशेष प्रतिनिधी
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याचा खणखणाट घुमला असून, मध्यरात्री झालेल्या गँगवॉरने पुणेकर हादरले आहेत. गंगानगर परिसरात वर्चस्वाच्या वादातून एका तडीपार गुंडाचा पाठलाग करून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राणा कांबळे असे मृत गुंडाचे नाव असून, या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यातील गंगानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन गटांत धुसफूस सुरू होती. मृत राणा कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. चोरी, मारामारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिसांनी त्याला शहरातून तडीपार केले होते. मात्र, कायद्याचा कोणताही धाक न बाळगता राणा शहरात उजळ माथ्याने वावरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास राणा कांबळे आणि आरोपी ओम मोरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि ओम मोरे आपल्या साथीदारांसह राणाच्या मागे कोयते घेऊन धावला.
आणि गंगानगरच्या गल्ल्यांमध्ये मध्यरात्री हा गँगवॉरचा थरार रंगला. आरोपींनी राणाला घेरले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. राणाने जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघांनी मिळून त्याला रस्त्यात गाठले आणि तिथेच त्याचा ‘गेम’ वाजवला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राणाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या तडीपारीच्या कारवाईवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तडीपार गुंड शहरात आलाच कसा? गंगानगर परिसरात त्याची दहशत असताना बीट मार्शल काय करत होते?मध्यरात्री कोयते घेऊन गुंड फिरतातच कसे?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली असून, मुख्य आरोपी ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके रवाना केली आहेत. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
Bloody Gang War Terrifies Pune! Externalized Goon ‘Finished Off’ in Broad Daylight
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन