नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या घरी येऊ नये, नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांचा संताप

विशेष प्रतिनिधी

पुणे : जोपर्यंत माझ्या चिमुकलीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या घरी येऊ नये,” असे कळकळीचे आवाहन नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी केले आहे.
देहू येथे लेकीच्या आस्थी विसर्जनासाठी गेले असताना त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे. १ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, पीडितेचे वडील सध्या विधींसाठी घराबाहेर असताना त्यांच्या घरी नेत्यांची गर्दी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावर संताप आणि दुःख व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.



“नमस्कार! मी पीडित मुलीचा वडील. आता मी आस्थी विसर्जनासाठी देहू इथे आलो असताना, माझ्या घरच्यांकडून मला फोन आला की, तिथे बरेच राजकारणी लोकं सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी भेटायला येऊ नये. एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कुणी लोकं आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं असेल तेव्हा भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नराधमाने माझ्या सांत्वनासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे”, असे पीडितेचे वडील म्हणाले आहेत.

६५ वर्षांच्या नराधमाने या चार वर्षांच्या बालिकेला ज्या क्रूरतेने संपवले आणि तिचा मृतदेह गोठ्यातील शेणात लपवून ठेवला, त्यावरून जिल्हाभरात जनक्षोभ उसळला आहे. आरोपीला तातडीने फाशी द्यावी किंवा त्याला आमच्या हवाली करावे, या मागणीसाठी नसरापूर ग्रामस्थ आणि पीडितेच्या नातलगांनी शनिवारी नवले पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ४ तास पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत, आंदोलकांना नवले पुलावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.

Nasrapur Case: “No Politician Should Visit Our Home Until the Monster Gets Death Penalty,” Says Father of Slain 4-Year-Old

महत्वाच्या बातम्या